निवड
‘स्किल इंडिया मिशन’अंतर्गत…या विद्यार्थ्यांची निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था संचलीत श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जुलै-२०२३ मधील अंतिम परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या आठ प्रशिक्षणार्थ्यांची कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य आणि लिओ अॅण्ड सॅग्रीटस,मुंबई या कंपनीच्या सहाय्याने स्किल इंडिया मिशन अंतर्गत डयुअल डिग्री प्रोग्राम आणि नोकरीसाठी जर्मनी देशामध्ये निवड झाली आहे.याबाबत राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या सहाय्यक संचालकांनी पत्राद्वारे कळविल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सांगितले.
या प्रशिक्षणार्थ्यांना जर्मनी येथे ड्युएल डिग्री प्रोग्रामसाठी निवडण्यात आले असून जपान मध्ये टेक्निकल इंटर्नटशिप ट्रेनिग प्रोग्राम साठी सुध्दा निवड प्रक्रिया चालू आहे.निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते मुंबई येथे सहयाद्री अतिथीगृहावर दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा,सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ आणि समितीचे सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर तसेच संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे निदेशक यांचे अभिनंदन केले आहे.तसेच निवड झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षण आणि रोजगारासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.