निवडणूक

पक्षासाठी आहुती दिली त्यांनाच पक्षाकडून कोलदांडा-आरोप !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहर आणि तालुक्यातील भाजपा संघटनेला उभे करण्यासाठी अनेक स्वर्गीय कार्यकर्त्यांनी आपली आहुती दिली मात्र त्याच तालुक्यात या संघटनेला सुरुंग लावणारे व वाटोळे करणारे काँग्रेसी नेतेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके कसे बनले असा गंभीर सवाल भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते,माजी नगराध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये विचारला आहे.

  

“कोपरगाव नगरपरिषद अध्यक्षपदाची भाजपाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही आपणास व प्रदेशाध्यक्ष यांना समक्ष भेटलो-लेखी मागणीही केली.मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१६ मध्ये ज्या उमेदवाराला महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी पराभूत केले होते त्याच व्यक्तीला आपण भाजपाची उमेदवारी बहाल केली हे मोठे आक्रित आहे”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार.

   कोपरगाव शहरात काल पुन्हा नगरपरिषद निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आघाडीचे कोल्हे गटाचे उमेदवार पराग संधान यांचे प्रचारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सभा घेतली आहे.त्यामुळे भाजपचे निष्ठावान गणले गेलेले माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे दुखावले गेले असून त्यांनी कालच्या सभेबाबत एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”कोपरगाव व अहिल्यानगर जिल्ह्यात संघ-जनसंघ व भाजपाची पाळेमुळे रोवण्यासाठी स्व.अण्णासाहेब बागुल,स्व.माणिकराव पाटील,स्व.सूर्यभान वहाडणे,स्व.बडदे बंधू,स्व.भांगरे,स्व.वसंतराव कोऱ्हाळकर,स्व.वहाडणे बंधू,स्व.ल.का.देशपांडे,स्व.शंकर लाल जाजू,हेरंब औटीव असंख्य स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी आयुष्य समर्पित केले.यांच्याच त्यागावर आपण आणि आजचा भाजप सत्तेचा सोपान चढला आहे.पण आज आपण आपला पक्ष काँग्रेसी प्रवृतीकडे गहाण टाकला कि काय ? असेच वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप केला आहे.

   या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी आधी मुख्यमंत्री यांचे कौतुक करताना,”आपण कार्यक्षम मुख्यमंत्री आहात यात शंकाच नाही;मात्र यावेळी कोपरगाव नगरपरिषद अध्यक्षपदाची भाजपाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही आपणास व प्रदेशाध्यक्ष यांना समक्ष भेटलो-लेखी मागणीही केली.पण आपण २०१६ मध्ये ज्या उमेदवाराला महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी पराभूत केले होते त्याच व्यक्तीला आपण भाजपाची उमेदवारी बहाल केली हे मोठे आक्रित आहे.हे त्या उमेदवाराचे सुदैव कि माझे दुर्दैव हेच आपल्याला वर्तमान काळात कळत नाही.आपण नगराध्यक्ष म्हणून काम करतांना राजकीय विरोध असतानाही विक्रमी विकासकामे केली असल्याचा दावा करून त्यांनी,सर्व पक्ष व सर्वधर्मिय जनतेला सोबत घेवून स्वच्छ कारभार करून दाखविला असल्याचे म्हटले आहे.दरम्यानच्या कालखंडात आपल्यावर एकही आरोप झाला नाहीव एकही आंदोलन पालिकेवर आले नाही.तरीही आपल्याला यावेळीही डावलण्यात आले हे सर्व अनाकलनीय आहे.
    
     लोकसभा निवडणुकीत सदाशिवजी लोखंडे यांच्या पराभवाला कारणीभूत असणाऱ्या ज्या नेत्यांच्या वस्तीवर आपण भेटी देता-तोंड भरून त्यांचे कौतुक करता त्या नेत्यांनी मूळ भाजपाच्या एकाही उमेदवाराला प्रभागातही उमेदवारी दिली नाही असा आरोप केला आहे.सर्व संघटनाच काबीज करणाऱ्या नेत्यांना इतके महत्व का दिले जात आहे ? गेली 45 वर्षे आपण संघ -भाजपाच्या विचारासाठी काम करतोय,अनेकदा अन्याय होऊनही आपण कधी टोपी बदलली नाही की झेंडा बदलला नाही की काठी.तरीही आपली उपेक्षा होत आहे.या वेदना खूपच असह्य आणि त्रासदायक आहे,पण आपल्याला पुन्हा नाईलाजाने अपक्ष उमेदवारी करावी लागत आहे.माझ्याकडे बँक बॅलन्स नसला तरी जनता माझ्यासोबत आहे हे मागच्या निवडणुकीत सिद्ध झालेलेच आहे.यावेळीही कोपरगावचे मतदार धनदांडग्या उमेदवारांना पराभूत करतीलच यात आपल्याला शंका वाटत नाही.
         
    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इतके आपण महान नाही,पण फार लहानही नाही.अजून किती उपेक्षा करणार आहात.तुमच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका होत होती त्यावेळी उत्तर द्यायला फक्त विजय वहाडणेच हा इसम कोपरगावात होता,ज्यांच्या ताब्यात कोपरगाव भाजपा आहे ते कधीही याबाबत बोलत नाहीत.गोहत्या विरोधात बोलण्याची त्यांची हिंमत नाही.अजून कितीही अन्याय झाला तरी भाजपा संघ विचारांपासून आम्ही बाजूला जाणार नाही.केवळ उमेदवार धनदांडगे आहेत म्हणून मतदार भुलणार नाहीत.हे पुन्हा एकदा सिद्ध होणारच आहे.उमेदवारांचे चारित्र्य-आर्थिक स्थिती-सामाजिक कार्य सर्वांसमोर आहे मतदार सुज्ञ आहेत.कुणीही प्रस्थापितांच्या भीतीपोटी बोलत नाही-बोलणारही नाही,पण कोपरगाव भाजपा संघटनेचे वाटोळे करणारेच आज तुमचे लाडके आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत असल्याची टिका अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांनी शेवटी केली आहे.त्याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close