निवडणूक
मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्धता करा-आहेर
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील २७० मतदान केंद्रावर मतदानावेळी मतदारांना किमान आवश्यक सुविधा पुरवणे आवश्यक आहे.सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मतदानापूर्वी स्वतः मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करीत मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करावी,असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी नुकतेच दिले आहेत.
राहाता येथील शिर्डी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे आदी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मतदान केंद्रांवर आवश्यकतेनुसार डागडुजी,दुरुस्ती करावी.सर्व मतदान केंद्रांवर प्रकाश,पिण्याचे पाणी,स्वच्छतागृहे,रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी.ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार मतदान करतील तेथे व्हीलचेअर व स्वयं सेवकांची व्यवस्था करण्यात यावी.पिण्याच्या पाण्याच्या पुरेशा उपलब्धतेची दक्षता घेऊन आयोगाच्या सूचनांनुसार आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची दक्षता घेण्यात यावी.
सर्व मतदार केंद्रावर प्रथमोपचार सुविधा देताना आवश्यक औषधे मतदान केंद्रावर उपलब्ध ठेवण्यात यावीत.तलाठी व ग्रामसेवकांनी गृह मतदारांच्यादृष्टीने आवश्यक तयारी करावी.मतदानाच्या चोवीस तास आधी व मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर वीज पुरवठा खंडीत होणार नाही यांची दक्षता महावितरणने घ्यावी.मतदानाच्या सात दिवस अगोदर सर्व मतदारांना बीएलओ मार्फत मतदार माहिती चिठ्ठी वाटप करण्यात यावी.याकामावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे,असे निर्देशही त्यांनी शेवटी दिले आहेत.