निवडणूक
कोपरगावात विधानसभेचा शिमगा सुरू !
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता.यावेळी सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळे आता निवडणूक रिंगणात १२ उमेदवार राहिले आहेत.यातील प्रामुख्याने आता तिरंगी लढत होत असून यातील अजित पवार राष्ट्रवादीचे आशुतोष काळे.शरद पवार गटाचे संदीप वार्पे यांच्यासह अपक्ष संजय काळे हे आपले नशीब अजमावत आहे.आणि खरी लढत या तिघात होणार असल्याचे उघड झाले आहे.
बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले असून राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन राज्यातील कोपरगावसह २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान कोपरगाव विधानसभेसाठी २० इच्छुक उमेदवारांच्या ३० अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी पार पडली.यावेळी किशोर मारोती पवार यांचा अर्ज बाद झाला होता.उर्वरित १९ पैकी सात जणांनी सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.आता निवडणूक रिंगणात १२ उमेदवार राहिले आहेत.आज माघार घेण्याची शेवटची संधी होती त्यात आज सात जणांना निवडणुकीतून पळ काढला असून रिंगणात आता बारा जण उरले आहे.
दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये सर्वात आधी आपल्या उमेदवारीची गर्जना करणारे वकील शंकर सुकदेव लासुरे (राष्ट्रीय समाज पक्षाचे),मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते विजय सुभाष भगत (अपक्ष),बाळासाहेब कारभारी जाधव (अपक्ष),विजय नारायणराव वडांगळे (अपक्ष),राजेंद्र माधवराव कोल्हे (अपक्ष),मनिषा राजेंद्र कोल्हे (अपक्ष) आदींनी आपल्या तलवारी जारांगे यांनी जाहीर केल्या प्रमाणे म्यान केल्या आहेत.तर या यादीत प्रभाकर पावजी आहीरे यांचा समावेश आहे.
दरम्यान निवडणूक रिंगणात असलेल्या बारा उमेदवारांमध्ये विद्यमान आ.आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी,अजित पवार गट),महेबुब खान पठाण (बहुजन समाज पक्ष),संदीप गोरक्षनाथ वर्पे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट),शिवाजी कवडे (बळीराजा पार्टी),शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी),किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष),खंडू गहिनीनाथ थोरात (अपक्ष),चंद्रहंस अण्णासाहेब औताडे (अपक्ष),दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष),विजय सुधाकर जाधव,(अपक्ष),विश्वनाथ पांडूरंग वाघ (अपक्ष) व संजय भास्करराव काळे (अपक्ष) यांचा समावेश असला तरी खरा सामना दोन्ही राष्ट्रवादीत होत असून यातील अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे विरुध्द संदीप वर्पे यांनी आपल्या अंगाला माती चोळली आहे तर त्यांच्या विरुध्द अपक्ष उमेदवार संजय काळे यांनी आपल्या दंडाच्या बेटकुळ्या फुग्वल्या असल्याचे दिसत असून आपला एकला चलोचा नारा दिला आहे.
कोपरगाव शहर आणि तालुका हा तसा सोपा मतदार संघ नाही.या तालुक्यातील मतदारांचा लौकिक पैसा फेको तमाशा देखो असा आहे.मात्र अलीकडील काळात तो लौकिक मतदारांनी बऱ्यापैकी पुसला असल्याचे दिसून येत आहे.त्याचे अलीकडील उदाहरण म्हणजे सन-२०१६ साली झालेली नगरपरिषद निवडणूक होय.या निवडणुकीत दोन्ही गडावरील मताचे पैसै घेऊन त्यांच्या पेकाटात लाथ घातल्याचे उदाहरण दुर्मिळ आहे.त्यामुळे गृहीत धरणाऱ्याना त्यांनी त्यांची जागा दाखवली आहे.त्यानंतर लोकसभा निवडणूक हे त्यातले त्यात आणखी एक उदाहरण म्हणजे शिर्डी लोकसभा या निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर करूनही लोकांनी काम करणाऱ्या खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना कौल दिला होता.त्यामुळे जनता संदीप वर्पे यांना स्वीकारणार की,तीन हजार कोटींचा बागुलबुवा उभा करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांना पुन्हा दुसऱ्यांदा संधी देणार की,संजय काळे या निस्वार्थ कार्यकर्त्यास दाद देणार हे लवकरच कळणार आहे.