निवडणूक
…फक्त विकला जावू नकोस !
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव विधानसभा निवडणुकीचा बार उडाला असून अद्याप आपले नमिनिर्देशन पत्र मागे घेण्यास चार दिवस उरले असताना अजित पवार राष्ट्रवादीने आपले उमेदवार आ.आशुतोष काळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी त्यांना तोडीस तोड शरद पवार राष्ट्रवादीचे संदीप वर्पे हे ही पिछाडीवर दिसत नसून त्यांनीं कंबर कसली असून त्यांच्या निवडणुकीकडे शरद पवार स्वतः लक्ष ठेऊन असल्याची विश्वसनीय माहिती हाती आल्याने सदर निवडणूक आ.काळे यांना अवघड जाणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.तर माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी दुर्बिणीच्या सहाय्याने तालुक्यातील तीन हजारांच्या विकास कामांचा शोध घेत असल्याने मतदारांना अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.राज्यातील सर्वच पक्ष आपापल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या कामात गुंतले आहेत.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली होती.त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवामधून धडा घेत भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी सावधपणे पाऊल टाकलं जात आहे.आतापर्यंत भाजपने १५२ जणांना उमेदवारी दिली आहे.अद्याप काही जागांचा तिढा आहेच.या दरम्यान भाजपच्या एका बड्या नेत्याने विधानसभेत किती आमदार निवडून येणार याचा आकडाच सांगितला.भाजपला ११० ते ११५ जागा मिळणार असल्याचा मोठा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.त्यामुळे विरोधी आघाडी सावध झाली आहे.त्यांनी आता कंबर कसली असून आपल्या बंडखोरांना आवरण्यास सुरुवात केली आहे.शेजारी राहाता तालुक्यात आजी माजी महसूलमंत्री यांचा फुगा फुटला असून त्यांनी जनतेला वेड्यात काढून आपली दुकानदारी जोरात सुरू ठेवली आहे.यातील विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची स्थिती अवघड असल्याचे राजकीय निरीक्षकांत बोलले जात आहे.तर दुष्काळी भागात दोन्ही बोलघेवड्या नेत्यांची अवस्था विदर्भातील दोन रेड्यासारखी मानली जात असून दोन्ही रेडे दिवसभर लढत बसले तरी त्यात कोणाचा विजय आणि कोणाचा पराभव होत नाही मात्र ज्याच्या शेतात ही लढाई होते त्याच्या जमिनीचे मात्र तेवढे वाटोळे होते.याचाच अनुभव कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील मतदारांना येत आहे.हे नेते कधीच एकमेकाच्या विरुध्द उभे राहणार नाही हे वास्तव आहे.मात्र निवडणुका जवळ आल्या की जनतेला,” नेमीच येतो पावसाळा” या उक्ती प्रमाणे यांचे लोकनाट्य सुरू होते.यावेळी त्याचा दाहक अनुभव जनतेला आला आहे.अद्याप माघार घेण्यास चार दिवस असले तरी अन्य उमेदवारांत फारसा दम असल्याचे दिसून येत नाही.
राहता तालुक्यात मंत्री विखे आणि माजी आ.एकनाथ घोगरे यांच्या स्नुषा प्रभावती घोगरे यांच्यात लढत होणार हे उघड आहे.सध्या तरी त्यांचे जोरदार वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे फुकटच्या तीर्थक्षेत्र वाऱ्या,घरघण्ट्या,शिलाई मशीन,घड्याळे,गणपती मंडळांच्या वर्गण्या वाया जाण्याची शक्यता बोलली जात आहे.कारण दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचे नसून तो अंधारात कितपत प्रकाश देतो हे महत्वाचे आहे मात्र या पातळीवर कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील हे दोन्ही तालुक्यातील नेते सपशेल नापास झाले आहेत.त्यामुळे ही निवडणूक निर्णायकी ठरणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.
दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांचे काम चांगले आणि प्रामाणिक आहे यात शंका नाही.मात्र संघटनात्मक पातळीवर त्यांची आणि संदीप वर्पे सपशेल नापास आहे.फरक इतकाच आहे की,संदीप वर्पे या उमेदवारास शिवसेना उबाठा यांची साथसंगत लाभली आहे.माणसाची संगत आणि पंगत चांगली लाभली की तो लाभापासून वंचित राहत नाही असे संत गजानन महाराज यांनी सांगून ठेवले आहे.त्यामुळे त्यांना या पंगतीचा लाभ होणार असल्याचे दिसून येत आहे.तीच बाब राहाता तालुक्यातील काँग्रसच्या महिला उमेदवार प्रभावती घोगरे यांची राहाता तालुक्यात आहे.
दरम्यान नेवासा तालुक्यात शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष ऍड.अजित काळे हे आपले नशीब आजमावत आहे.त्यासाठी त्यांनी,’आधी केले मग सांगितले ‘ ही उक्ती वापरून शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी ५ हजार ६०० कोटींच्या कर्जमाफीचा उच्च न्यायालयातून लाभ मिळवून दिला आहे.शिवाय अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिद्दीने लढवली,गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची पेन्शन काढून दिली,त्याच कारखान्याच्या निवडणुकीत आपले नामनिर्देशन भरून सत्तेचा राजमार्ग माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आ.स्नेहलता कोल्हे त्यांचे युवराज विवेक कोल्हे यांना निर्माण करून दिला आहे.या शिवाय श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावांच्या शेतकऱ्यांना आकारी पडीत जमिनी मिळवून दिल्या आहेत.निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे निळवंडे कालवा कृती समितीला मोफत विधी सहाय्य देऊन उच्च न्यायालयातून कालव्यांचा मार्ग मोकळा करून दिला आहे.असे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे.त्यांना राजसत्तेचा सोपान मतदार निर्माण करून देणार का असा सवाल निर्माण झाला आहे.मात्र या बाबतीत जनता अनेक वेळा नापास झाली असल्याचे दिसून आले आहे.त्यामागे अर्थातच पैसा आणि मद्य या दोन गोष्टी कारणीभूत होत असल्याचे दिसून येत आहे.”राजकीय निरक्षर हा सर्वात वाईट निरक्षर असतो” असे जर्मन विचारवंत ब्रेफ्ट याने म्हंटले हे ते उगीच नाही.त्यामुळे वरील दोन्ही प्रामाणिक ऍड.अजित काळे आणि संजय काळे उमेदवारांना जनता स्वीकारणार नाही असे मागील अनुभवावरून दिसून येत आहे.बळी जात असलेला पशू ज्या प्रमाणे हिरवे गवत मोठ्या आनंदाने खात असतो तशी येथील मतदारांची अवस्था आहे.असे झाले तर जनतेच्या भाळी या संस्थानिकांचे हातपाय दाबण्याचे-चेपण्याचे गुलामीचे काम तेव्हढे उरणार आहे.घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगून ठेवले आहे की,”तुम्ही किती चालत गेला या पेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे” त्याबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जनता कायम नापास होत आली आहे.आता या निवडणुकीत ते कोणता प्रताप करतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.ते आगामी २० नोव्हेंबर २०२४ हा मतदानाचा दिवस दाखवून देणार आहे.डॉ.आंबेडकरांनी सांगून ठेवले आहे की,”लढला नाही तरी चालेल पण विकला जावू नकोस” बघू मतदार काय दिवे लावतो ते असो.
मो.9423 43 9946.