निवडणूक
…या विधानसभेसाठी शिवसेनेचा सवता सुभा !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी काही दिवसात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याची माहिती शिवसेनेच्या कोपरगाव येथील बैठकीत शिवसैनिकांनी दिली आहे.त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणूक रंजक होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.या प्रश्नी लवकरच पक्षप्रमुख उध्दव ठाकरेची भेट घेण्याचे ठरविण्यात आले असल्याची माहिती माजी शहर प्रमुख कलविंदर दडीयाल यांनी दिली आहे.त्यामुळे कोपरगाव शिवसेना,”देर आये,दुरुस्त आये” अशी प्रतिक्रिया तालुक्यात उमटली आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठ्या पीछेहाटीचा सामना करावा लागला. २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या २३ जागा निवडून आल्या होत्या.यंदा त्या जागा ८ पर्यंत खाली आल्या आहेत.त्याशिवाय महयुतीलाही जागांचा फटका बसला असून तिन्ही पक्षांच्या मिळून अवघ्या १७ जागा जिंकून आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी महायुतीकडून सावध पावलं टाकली जात आहेत.विधानसभेच्या २८८ जागांसाठी अवघ्या दिड -दोन महिन्यांत,अर्थात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाराष्ट्रातील दोन प्रमुख आघाड्या,अर्थात एकीकडे भाजपा-शिंदे गट-अजित पवार गटाची महायुती तर दुसरीकडे ठाकरे गट-शरद पवार गट-काँग्रेसची महाविकास आघाडी यांनी मित्रपक्षांसोबतच निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन आघाड्यांमधील ही थेट लढत पाहायला मिळणार आहे.त्यानुसार दोन्ही बाजूला जागावाटप,इच्छुक उमेदवार,संभाव्य उमेदवार, विजयाची शक्यता वगैरे चर्चा सुरू झाल्या आहेत.कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्यास अपवाद नाही.येथेही नवीन राजकीय समीकरणे उदयास येत आहेत.कोल्हे गट नवीन घरोबा शोधत असताना शिवसेनेने आपली राजकीय खेळी करण्यास प्रारंभ केला आहे.त्यासाठी त्यांची बैठक नुकतीच कोपरगाव शहरात पार पडली आहे.
या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभेची जागा उद्धव ठाकरे शिवसेनेची असून शिवसैनिकालाच उमेदवारी मिळावी यावर एकमत झाले असून उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष तथा माजी उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या प्रकरणी लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती आहे.त्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी ते किती काळ राहणार हा प्रश्न आहे.
या बैठकीस जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे,उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,प्रमोद लबडे,तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,श्रीरंग चांदगुडे,शहर प्रमुख सनी वाघ,कालुअप्पा आव्हाड,भरत मोरे,असलम शेख, कलविंदरसिंग दडीयाल,गगन हाडा,प्रवीण शिंदे,मनोज कपोते प्रफुल्ल शिंगाडे,रवी कथले,नितीश बोरूडे, बाळासाहेब साळुंके,राहुल देशपांडे,मुन्नाभाई मन्सुरी,संजय दंडवते,पप्पू पडियार,रंजन जाधव,मधु पवार,गिरधर पवार,राजू शेख,आशिष निकुंभ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान एका माहितीनुसार या स्पर्धेत अजून काही नावे चर्चेत असून ते उघड बोलत नाहीत अशी माहिती हाती आली असून यात मुकुंद सिनगर,प्रमोद लबडे,कोपरगावचे भूमिपुत्र शिवाजी रहाणे,माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे आदींची नावे समोर आली आहे.
मात्र शिवसेनेचा गत चाळीस वर्षांचा इतिहास पाहता त्यांनी सन-१९८५ पासून स्वतंत्र निवडणूक लढवली असल्याचे दिसून आलेले नाही.शिवसेनेची दोन गटात विभागणी करून आपल्या सत्तेच्या पोळ्या एक सन -१९९५ ची निवडणूक वगळता स्थानिक साखर सम्राट भाजून घेत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.त्यामुळे याकडे नागरिक एक करमणूक म्हणून पाहू शकतात असे म्हटले जात आहे.त्यास वरिष्ठ नेतृत्वही जबाबदार असल्याचे दिसून आले आहे.साखर सम्राटांनी त्यांना वेळोवेळी आपल्या दावणीला बांधल्याचे या चाळीस वर्षांचा इतिहास सांगतो.मात्र शिवसेनेचा हा पण किती काळ टिकणार याकडे तालुक्यातील मतदारांचे लक्ष लागून आहे.