निवडणूक
खा.लोखंडे यांनी मते लाटण्यासाठी निळवंडेचे नाव वापरले-…यांची टिका
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी गत दहा वर्षात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील १८२ गावातील मतदारांची मते लाटण्यासाठी केवळ नाटक केले असून त्यांनी केंद्र सरकारकडून एक रुपया आणला नसल्याची प्रखर टिका निळवंडे पाटपाणी कृती समितीचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे यांनी आज सकाळी ११ वाजता शिर्डीत एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघात येत्या १३ मे रोजी मतदान होत असून दि.१८ एप्रिल पासून आपले उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे.या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात नुकतीच महाआघाडीची सभा मोठ्या उत्साहात संपन्न झालेली आहे.या मतदार संघात विद्यमान बाळासाहेब ठाकरे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ) गटात प्रवेश कर्ते झालेले विद्यमान खा.सदाशिव लोखंडे व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रमुख सामना होणार असला तरी प्रहार जनशक्ती व शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे आदींनी संयुक्तपणे प्रहार चे जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांना आपली उमेदवारी शिर्डीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली असून त्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी तयारी सुरु केली असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.त्यात राजेंद्र वाघमारे,उत्कर्षा रुपवते आदी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांनी बंडखोरी करण्याची तयारी सुरु केली असल्याचे दिसून येत आहे.तरी यात वर्तमानात माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे पारडे मात्र सर्वाधिक जड दिसून येत असल्याने त्यांच्याकडे प्रवेश करणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.त्यात संगमनेर येथील महाआघाडीच्या सभेत निळवंडे पाटपाणी समितीचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे यांनी थेट खा.सदाशिव लोखंडे यांच्यावर शरसंधान साधत जाहीर प्रवेश केला असून माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना जाहीर पाठींबा दिला आहे.त्याबद्दल त्यांचा माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डीत सत्कार आयोजित केला होता.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,निळवंडे कृती समितीचे मार्गदर्शक गोपीनाथ घोरपडे,अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे,उपाध्यक्ष गंगाधर गमे,रवींद्र वर्पे,संजय येलम,मच्छीन्द्र येलम,बबनराव पोकळे,विजय निर्मळ,राजेंद्र निर्मळ,श्रीकांत मापारी,उत्तम भास्कर घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”निळवंडे प्रकल्प मंजूर होऊन आता ५४ वर्ष उलटत आली आहे.अद्यापही हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही.मात्र आमच्यासह निळवंडे कालवा कृती समितीने यासाठी मोठा पाठपुरावा करून माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून सन-२०१४ अखेर १७ पैकी १४ मान्यता मिळवल्या होत्या.मात्र तत्कालीन भाजप सरकारने नगर जिल्ह्यातील मंत्र्यांचे ऐकून पुढील तीन मान्यतांना खोडा घातला होता.त्यासाठी समितीने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.व पुढील काम मार्गी लावले होते.गतवर्षी जलपूजन झाले असले तरी यात जिल्ह्यातील नेत्यांचा काहीही संबंध नाही असे सांगून हि मंडळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आदींना आणून त्यांच्या आडून श्रेय घेऊ पाहत असून जनतेला सर्व खरी माहिती आहे.खरे काम कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यानी केले आहे.आता मात्र विद्यमान महसूल मंत्री श्रेयवादासाठी सर्वात पुढे येत असून त्यांचा या प्रकल्पासाठी कुठलेही योगदान नसल्याचे त्यांनी बजावले असून वर्तमानात काही पाटपाणी पदाधिकारी व कार्यकर्ते विखे यांची पाठराखण करत असल्याबद्दल निषेध व्यक्त करून त्यांच्यावर तिखट शब्दात टिका केली आहे.यात खा.सदाशिव लोखंडे यांनी कोणतीही भूमिका निभावली नसल्याची टीका केली आहे.उलट राज्यात युतीची सत्ता असताना व मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना शेजारी बसून निधी मंजूर करुन घेणे गरजेचे असताना त्यांनी दुष्काळी जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी मोटार सायकल रॅली काढून जनतेची करमणूक केली असून त्यामुळेच दुष्काळी जनतेला पाणी आल्याची चक्क खोटी बतावणी केली असल्याचे वास्तव घोरपडे यांनी जनतेपुढे आणले आहे.त्यामुळे उत्तमराव घोरपडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यावेळी उपस्थित पाटपाणी समितीचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे,निळवंडे कृती समितीचे मार्गदर्शक गोपीनाथ घोरपडे,अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे,उपाध्यक्ष गंगाधर गमे,रवींद्र वर्पे,संजय येलम,मच्छीन्द्र येलम आदींनीं पाठींबा दिल्याबद्दल माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.सदर प्रसंगी उपस्थितांचे राजेंद्र निर्मळ यांनी आभार मानले आहे.