नदी प्रदूषण
मायभूमी सामजिक संस्थेकडून गोदापात्राची स्वच्छता !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चासनळी येथे गोदावरी नदीपरिसरात तब्बल २२ एकरावर श्रीराम सृष्टी स्थापन होत आहे.मात्र भाविकांकडून टाकण्यात आलेले निर्माल्य,दशक्रिया विधीचे साहित्य पत्रावळी यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला होता.तो परिसर मायभूमी सामाजिक संस्थेकडून स्वच्छ करण्यात आला आहे.
हिंदू धर्मात नदीला पवित्र आणि माता असे मानले जाते.मात्र भाविक निर्माल्य,जुने वस्त्र,देवदेवतांचे फोटो,रक्षा विसर्जन,मृत व्यक्तींच्या वस्तू आणून टाकतात त्यामुळे नदीला अस्वच्छतेचे स्वरूप येते.गोदावरी नदीत स्नान केल्याने पुण्य मिळते,पाप धुवून जाते असे म्हटले जाते मात्र सध्या गोदावरी नदीच्या पात्रात अल्प पाणी असल्याने निर्माल्य साचले असून ते वाहून जात नाही त्या पाण्यात पाप कसे धुवून जाणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.उरलेलं उष्ट अन्न खाऊन माणकेश्वर नगर मधील एका गरीब व्यक्तीच्या अनेक शेळ्या मरण पावल्या ही बाब मायभूमी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळाली होती.त्यांनी तातडीने गोदापात्रात धाव घेतली. तेथे प्लॅस्टिक,रबर,प्लॅस्टिक ग्लास,पत्रावळी,उष्टे अन्न,जुन्या गाद्या,गोधड्या पडलेल्या होत्या.नदीपात्रात दारू पिणाऱ्यांच्या पार्ट्या सुद्धा व्हायला लागल्याने तीही अस्वच्छता होतीच. हे बघून मायभूमी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी गोदावरी नदी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यास कृतीची जोड देत नदीपात्र स्वच्छ केले आहे.या मोहिमेत संस्थेचे सचिन चांदगुडे,संतोष पऱ्हे,कैलास माळी,सुनील चांदगुडे,बबन गाडे,देविदास कसोदे,शांतीलाल बिरुटे,शाम कासार,सुरेश अष्टेकर,बाळासाहेब सैंदाणे,सुकदेव माळी, भाऊसाहेब चांदगुडे आदी सदस्य सहभागी झाले होते.
“चासनळी येथे श्री प्रभू रामचंद्र यांनी बाण मारला व त्यामुळे जी खोल नदी तयार झाली तिला चासनळी म्हणतात.मात्र नागरिक आता त्या नळीतच निर्माल्य टाकायला लागले आहेही खूपच खेदाची बाब आहे.मोर्वीस गावाच्या बाजूने शनीमंदिराजवळ अनेक भग्न मूर्ती विसर्जित केल्या जातात.प्लॅस्टिक,कचरा टाकतात त्यामुळे चासनळीचे पावित्र्य धोक्यात आले आहे”-सचिन चांदगुडे,कार्यकर्ते चासनळी,ता.कोपरगाव.