दुष्काळ
रोहित्रातील कॉईलची चोरी,उजनी योजना सुरू होण्यावर प्रश्न चिन्ह !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येकडील रांजणगाव देशमुख,जवळके,धोंडेवाडी,वेस,सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,मनेगाव आदी गावातील दुष्काळी शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्यातील २०० के.व्ही.ए.च्या विद्युत रोहित्रातील तांब्याची तार (कॉईल) आणि त्यातील किंमती ऑइल असा सुमारे १.५० लाख रुपयांचा अवैज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे या अवर्तनाचे पाणी शेतकऱ्यांना व पिण्यासाठी मिळणार का असा सवाल निर्माण झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,” सन-२००४ पर्यंत राजकीय नेत्यांनी जाणीवपूर्वक बंद ठेवलेली कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील जिरायती गावांना वरदान असलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी १९९३ च्या या भागातील जनतेच्या विविध आंदोलनानंतर सुरु केली होती.पुन्हा सुरु करण्यासाठी माजी आ.अशोक काळे यांनी २००५ साली विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवत हि योजना पूर्ववत सुरु करून पश्चिम भागातील गावांना त्यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळात मोठा दिलासा दिला होता.दुर्दैवाने २०१४ नंतर या योजनेकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्यामुळे हि योजना बंद पडून या भागातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले असतांना आ.आशुतोष काळे यांनी आपल्या २०१९ च्या विधानसभा जाहीरनाम्यात उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करण्याची गर्जना केली होती.
वर्तमानात या योजनेसाठी दरवर्षी येणारे वीज मोटारीचे वीज बिल व वीज मोटारीच्या पंपांच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चासाठी करावी लागणारी तरतूद काळे सहकारी साखर कारखाना करीत असल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.त्यामुळे २०१९ ते २०२४ पर्यंत हि योजना कार्यान्वित राहिली आहे.यावर्षी देखील हि योजना कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या क्षमतेच्या वीज मोटारी व पंपांच्या दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली असून महावितरणचे सहाय्यक अभियंता अरविंद अग्रवाल,कनिष्ठ अभियंता रोशन टर्ले यांनी भेट देवून सुरु असलेल्या कामाची पाहणी केली असल्याची माहिती हाती आली आहे.पाईपलाईन लिकेज व इतर किरकोळ कामाबरोबरच दुसऱ्या टप्यातील थकीत विजेचे बिल देखील महावितरणला अदा करण्यात आले असल्याची माहिती या योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी दिली होती अशातच काल सकाळी या योजनेबाबत धक्कादायक माहिती हाती आली असून या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील २०० के.व्ही.ए.विद्यूत रोहित्रातील कॉईल आणि ऑइल अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.त्याची अंदाजे किंमत १.५० लाख रुपये असल्याची माहिती महावितरण कंपनीचे रांजणगाव देशमुख येथील कनिष्ठ अभियंता रोशन टरले यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान याबाबत या योजनेच्या अध्यक्षांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची गरज असताना अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही.त्यामुळे ही योजना खरेच सुरू होणार का ? असा सवाल दुष्काळी शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.यावर आ.आशुतोष काळे हे आपली भूमिका जाहीर करतील असा कयास व्यक्त होत आहे.
दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार जलसंपदा विभागाचे उपअभियंता विवेक लव्हाट यांनी म्हटले आहे की,’उजनी योजनेच्या विद्युत रोहित्राची तात्पुरती व्यवस्था निर्माण केली असून योजना सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.मात्र ही योजना किती दिवस चालेल या बाबत त्यांनी देण्यास असमर्थता दर्शवली आहे.