जलसंपदा विभाग
निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री
न्यूजसेवा
अकोले-(प्रतिनिधी)
निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक असून निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
“अकोले व परिसरातील शेतकरी,आदिवासी बांधवांच्या प्रदीर्घ लढा व संघर्षामुळे आज निळंवडे धरण कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे.मधुकर पिचडांनी आधी शेतकऱ्यांचे पुनर्वसन मग धरण अशी त्याकाळात भूमिका मांडल्यामुळे विस्थापितांना न्याय मिळाला आहे.आता यापूर्वीचे सर्व वाद निळवंडे कालव्याच्या पाण्यात विसर्जित करून आपण आजच आनंद साजरा करू या.(कारण ते सर्व अंगलट येतील हि साधार भीती असल्याने) पुढील दोन महिन्यात उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल”महसूल मंत्री विखे.
अ.नगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी सात तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली आहे.त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
“यावर्षीच्या बजेट मध्ये गोसीखुर्द नंतर सर्वाधिक निधी निळवंडे धरणासाठी देण्यात आला आहे.त्यामुळे या धरण कालव्यांचे काम कोठेही थांबणार नाही.धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल”-देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.
सदर प्रसंगी प्रारंभी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जलपूजन करून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली.यावेळी महसूल,पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा.सदाशिव लोखंडे,खा.डॉ.सुजय विखे,जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर,नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भोगले, अधीक्षक अभियंता अरूण नाईक,जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले,माजी मंत्री मधुकर पिचड,अण्णासाहेब म्हस्के,माजी आ.स्नेहलता कोल्हे,वैभव पिचड आदी मान्यवर उपस्थित होते.
या शासनाने पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत शेतकरी,कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय घेतला असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,शासनाने अकरा महिन्याच्या कालावधीत २९ प्रकल्पांना तात्काळ सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.यामुळे राज्यातील ६ लाख ८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून शासन काम करत आहे.केंद्राच्या धर्तीवर राज्याने शेतकऱ्यांना नमो महासन्मान योजना सुरू केली आहे.यात शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे ६ हजारांची मदत दिली जाणार आहे.एक रूपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना निकषाच्या दुप्पटीने मदत देण्यात आली.राज्याने २५ लाख हेक्टर क्षेत्रावर सेंद्रीय शेतीचे उद्दिष्ट ठेवले असून जलयुक्त शिवार योजना टप्पा २ सुरू करण्यात आला आहे.’निळवंडे च्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना ५३ वर्ष वाट पाहावी लागली असल्याची सल त्यांनी बोलून दाखवली हा नगर जिल्ह्यातील मंत्र्यांना शालजोडा असल्याचे मानले जात आहे.आता ही प्रतिक्षा फक्त या शासनाने घेतलेल्या कल्याणकारी निर्णयामुळे संपली आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी सांगितले आहे.
‘निळवंडे’ कालव्यांच्या कामांना गती देणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”निळवंडे प्रकल्पाचा इतिहास मोठा (जनतेस नादी लावण्याचा असे अपेक्षित असावे) आहे.सुरूवातीला ८ कोटींचा रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा झाला आहे.(मात्र याला कोण जबाबदार हे त्यांनी संबंधित व्यक्ती व्यास पिठावर असल्याने टाळले असावे) २०१७ मध्ये या प्रकल्पास अडीच हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि या प्रकल्पास गती मिळाली.(यात सप्टेंबर मध्ये निळवंडे कालवा कृती समितीने जनहित याचिका क्रं.१३३/२०१६ हि दाखल केल्यानंतर असे अपेक्षित असावे) धरणाच्या सुरूवातीच्या २२ किलोमीटरला स्थानिक शेतकरी व आदिवासींना विश्वासात घेऊन गती देण्यात आली.(मात्र २०१९ मध्ये २५० हुन अधिक पोलीस बळ का वापरावे लागले यावर सविस्तर मौन पाळले आहे)
यावर्षीच्या बजेट मध्ये गोसीखुर्द नंतर सर्वाधिक निधी निळवंडे धरणासाठी देण्यात आला आहे.त्यामुळे या धरण कालव्यांचे काम कोठेही थांबणार नाही.धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी दिली आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २०१४ ते २०१९ या काळात नगर जिल्ह्यातील २ लाख,९८ हजार हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली असल्याची माहिती ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की,”अकोले व परिसरातील शेतकरी,आदिवासी बांधवांच्या प्रदीर्घ लढा व संघर्षामुळे आज निळंवडे धरण कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे.मधुकर पिचडांनी आधी शेतकऱ्यांचे पुनर्वसन मग धरण अशी त्याकाळात भूमिका मांडल्यामुळे विस्थापितांना न्याय मिळाला आहे.आता यापूर्वीचे सर्व वाद निळवंडे कालव्याच्या पाण्यात विसर्जित करून आपण आजच आनंद साजरा करू या.(कारण ते सर्व अंगलट येतील हि साधार भीती असल्याने) पुढील दोन महिन्यात उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
यावेळी खा.सदाशिव लोखंडे,माजी आ.वैभव पिचड यांनी आपले मनोगत केले.या कार्यक्रमास निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कालव्यात पाणी सोडल्यामुळे यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहवयास मिळाला.मात्र उपस्थित समितीला मुख्यमंत्र्यांच्या सत्काराची संधी सोडल्यास कुठेही संधी दिली नाही.(त्याच वेळी एक दक्षिणेचा खा.आणि सत्ताधारी पक्षाचा जिल्हा प्रमुख एकमेकांकडे पाहून हसताना उपस्थितांना दिसले आहे) खा.लोखंडे यांनीही आपल्या भाषणात त्यांना सविस्तर बगल दिल्याचे पाहावयास मिळाले आहे.यामागे अर्थातच प्रस्थापित नेत्यांचा दबाव असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे लाभक्षेत्रात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.