ग्रामविकास
…या ठिकाणच्या घरकुल लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून द्या-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील ८९ नागरिकांना घरकुल योजनेची घरे मंजूर झाली आहे.मात्र त्यांना घर बांधणीसाठी जागाच उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी कोंडी झाली आहे.त्या नागरिकांना गावातील गट क्रं.१३४/३ व गावठाण नावे असणारी क्रं.१३४/१ मधील जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थानीं जेऊर कुंभारी येथील सरपंच यांचेकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.१.२० लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.१.३० लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येत आहे.प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेचे अर्थसहाय राज्यस्तरावरील बँक खात्यातून पी.एफ.एम.एस. प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या बँक अथवा पोस्ट खात्यात जमा होणार आहे.ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.
लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते.ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा,कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी अशा सर्वसाधारण अटी आहेत.त्यासाठी अनेक आर्थिक गरजू नागरिक प्रयत्न करत असतात.अशा गरजूना जेऊर कुंभारी हद्दीत सुमारे ८९ घरे मंजूर आहेत.मात्र त्या लाभार्थ्यांना जागाच उपलब्ध नाही त्यामुळे त्यांच्या अनुदानावर टांगती तलवार आहे.अशा गरजुना जागा असेल तर त्यांच्या घराचे स्वप्न साकार होऊ शकते.त्यासाठी हि मागणी करण्यात आली असल्याचा दावा सदर निवेदनात केला आहे.बऱ्याच वेळा गोदावरी नदीस पूर येतो त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांना अकाली संकटांचा सामना करावा लागतो मात्र वरील गट क्रमांकाची जागा उपलब्ध करून दिल्यास या नागरिकांचे कल्याण होईल असा दावा करण्यात आला आहे.
सदर निवेदनावर अंकिता बाबासाहेब गायकवाड,धनश्री नामदेव वक्ते,किशोर मनोहर वक्ते आदिंच्या सह्या आहेत.त्यामुळे गरजू लाभार्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.