गृह विभाग
गंभीर गुन्हयातील ३५ आरोपी येरवडा येथे स्थलांतरित,कोपरगावातील घटना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव कारागृह हे वर्तमानात कोंडवाडा बनले असून येथे विविध गंभीर गुंह्यातील आरोपी क्षमता नसताना जास्त दिवस ठेवून विविध समस्या निर्माण होत असून तेथील आरोपी आज पोलीस बंदोबस्तात हलविण्यात आले असल्याची माहिती तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी नुकतीच दिली आहे.
दरम्यान गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरगाव येथील उपकारागृहात या काही जबाबदार अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आरोपींना गांजा,भ्रमणध्वनी,व तत्सम मोठ्या प्रमाणात सर्व सोयीसुविधा प्राप्त होत होत्या.त्यामुळे हे आरोपी बेताल झाले होते.त्यांनी अनेक आरोपींवर अत्याचार केले होते याशिवाय एका अधिकाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना या आरोपींना सांभाळण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.आता त्यांची यातून सुटका होणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
गेली दोनअडीच वर्षे देशभरात कोरोनाने थैमान घातले होते.त्यामुळे या कालावधीत संसर्ग वाढू नये,याकरीता कैद्यांना तात्पुरता जामीन व पॅरोलवर सोडण्यात आले होते.मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध हटविण्यात आले.त्यामुळे जामीन तसेच पॅरोलवर सोडलेल्या कैद्यांना पुन्हा कारागृह वापसी करावी लागली होती.सध्या राज्यातील कारागृहांमध्ये जवळपास १७२ टक्के अधिक कैदी असल्याची माहिती समोर आली आहे.परिणामी,क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्यामुळे शिक्षा भोगणार्यांची घुसमट होत आहे.
राज्यात मध्यवर्ती कारागृह ९,जिल्हा कारागृह २८,विशेष कारागृह १,किशोर सुधारालय १,मुंबई जिल्हा महिला कारागृह १,खुले कारागृह १०,खुली वसाहत अशी एकूण ६० कारागृहे आहेत.३१ ऑगस्टपर्यंतच्या अहवालानूसार या कारागृहांची अधिकृत बंदीक्षमता २४ हजार ७२२ आहे.मात्र प्रत्यक्षात ४२ हजार ५७७ कैदी कारागृहात असल्याची माहिती समोर आली आहे.एकूण कैद्यांमध्ये सिद्धदोष बंदी ०८ हजार २४९,न्यायाधीन बंदी ३४ हजार ११७ व इतर २११ कैद्यांचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील उपकारागृह त्याला अपवाद नव्हता.कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीत जुने उपकारागृह असून यात ०७ बराकी आहे.यात आरोपीना ठेवण्याची क्षमता केवळ २५-३० असताना या ठिकाणी वरील गंभीर गुंह्यातील ३५ आरोपींना ठेवण्यात आले होते.यासह येथे एकूण ९० च्यावर आरोपी जेरबंद होते. त्यात कोपरगाव शहर,तालुका पोलीस ठाणे,शिर्डी,राहाता,लोणी,श्रीरामपूर आदी ठिकाणच्या भा.द.वि.खुनाचे कलम-३०२,खुनाचा प्रयत्न कलम-३०७,दरोडा कलम-३९५,बलात्कार-३७६ आदी गंभीर गुंह्यातील ३५ आरोपींचा समावेश होता.यात प्रामुख्याने शिर्डी येथील सुरज ठाकरे,यांचेवर गोळीबार केलेला आरोपी किरण हजारे,तनवीर रंगरेज,आकाश लोखंडे,आदीसह शिर्डी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिंगटोन प्रकरणातील सागर शेजवळ खून प्रकरणातील आरोपी सोमनाथ वाडेकर,रामा जाधव,दीपक मांजरे,शोएब शेख,किरण आजबे,विशाल कोते आदींचा समावेश आहे.याशिवाय लोणी येतील पोलीस ठाण्यातील धोकादायक आरोपी शाहरुख सत्तार खान आदींचा समावेश होता.
सदर आरोपींना हलविण्याचा अहवाल कोपरगाव येथील तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी दि.०७ जानेवारी रोजी येरवडा येथील उपमहानिरीक्षक यांना दिला होता.त्यांनी दि.२४ जानेवारी रोजी ३५ आरोपीना वर्ग करण्याचा व हलविण्याचा निर्णय कोपरगाव येथील उपकारागृह अधीक्षक यांना दिला होता.त्यानुसार आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,यासह सहा पोलीस ठण्याचे सुमारे २४ अंमलदार आदींच्या बंदोबस्तात कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी तपासणी करून त्यांची रवानगी केली आहे.त्यासाठी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहाय्य केले आहे.