क्रीडा विभाग
…या फुटबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड गौरवाची-अमिषकुमार
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
कोपरगाव नजिक असलेल्या कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने २०२४-२५ या हंगामातील तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत विजयी होत विजेतेपद पटकावले असून या संघाची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड ही कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्राधिकरण अधिकारी अमिषकुमार यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठया उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे होते.
सदर प्रसंगी शाळेचे प्राचार्य डॉ.विनोदचंद्र शर्मा,आस्वाद मेस विभागाचे अध्यक्षा सुहासिनी कोयटे आदी मान्यवर उपस्थित होत्या.
सदर प्रसंगी विजयी संघाचे नेतृत्व करणाऱ्या रणवीर मांजरे व प्रतिनिधित्व करणाऱ्या आगम सांड,स्वराज ठाणगे,शमित पवार,युगांत रोडे,ऋषिकेश कोळपे,अमेय केकान, नानासाहेब चव्हाण,शहाजी पिंपळे,धीरज चव्हाण,श्लोक वालतुरे,अखिलेश अनभुले,नंदराज पाटील,शौर्य कुंभार,उदयराज चव्हाण,आलोक सोनी,दर्शन गाजरे आदींचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी समता इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा विभागाचे फुटबॉल शिक्षक शुभम औताडे यांचे ही अभिनंदन केले आहे.
सदर प्रसंगी ओमप्रकाश कोयटे म्हणाले की,”समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपले विशेष कौशल्य आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.कर्णधार रणवीर मांजरे यांच्या नेतृत्वाखाली संघाने जिल्ह्यातील काही बलाढ्य संघांना पराभूत करून संघातील खेळाडूंनी चुणूक दाखविली.हा विजय खेळाडूंच्या कठोर परिश्रमाचा आणि समर्पणाचा आहे.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.विनोदचंद्र शर्मा म्हणाले की,”उपांत्यपूर्व फेरीत समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने गौतम पब्लिक स्कूलच्या संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली.उपांत्य फेरीत संजीवनी अकादमीचा पराभव करून महाअंतिम फेरीत आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल विरुद्धचा रोमहर्षक सामना जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.या सामन्यात समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलच्या संघाचा ४-१ ने पराभव करत विजय मिळविला.समताचा विद्यार्थी शिक्षणाबरोबरच विविध क्रीडा प्रकारात निपुण व्हावा.यासाठी समता इंटरनॅशनल स्कूलचा क्रीडा विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो अशी माहिती दिली आहे.
या वेळी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,प्राचार्य डॉ.शर्मा,आस्वाद मेस विभागाचे अध्यक्षा सुहासिनी कोयटे,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विजयी संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.