जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव शहर अतिक्रमणाच्या विळख्यात,गुन्हेगारीत वाढ !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरात गतवर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दि.०६ एप्रिलच्या दौऱ्यात अतिक्रमण काढण्याचा अर्धवट प्रयत्न दौरा संपल्यावर पुन्हा सोडून देण्यात आला त्या नंतर या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा अवैध टपरीवाल्यांचे फावले असल्याचे दिसून येत असून त्यात काही आजी-माजी लोकप्रतिनिधी राजरोस या टपरी धारकांकडून पतसंस्थांच्या कर्ज वसुलीसारखे हप्ते वसूल करताना दिसत आहे.कोपरगाव शहरात पुन्हा एकदा हा प्रश्न डोके वर काढत असल्याचे दिसत असून त्यातून गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे.

“कोपरगाव शहरात अवैध व्यवसाय वाढीला लगाम घालण्यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबविण्यात येत असून त्या अंतर्गत सर्वेक्षण झाले असून ०१ हजार ५०० टपरी धारकांना जागा निश्चित करण्यात येत असून त्याची समिती नेमण्याची काम सुरु असून या २० सदस्यांपैकी फेरीवाल्या मधून १२ सदस्य नेमण्याचे काम सुरु आहे.मात्र त्याबाबत काही नवीन मार्गदर्शक सूचना केंद्राने दिल्या आहेत.त्यानंतर ते धोरण राबविले जाणार आहे.या शिवाय शहरातील अवैध व्यवसायिकांना हटविण्याचे काम सुरू करणार आहे”-शांताराम गोसावी,प्रशासक तथा मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरातील नागरिकांचे दोन हजाराहून अधिक व्यापाऱ्यांचे अतिक्रमणे १० मार्च २०११ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी,व प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी उध्वस्त केले होते.त्यावेळी अनेकांचे संसार रस्त्यावर आले होते.अनेकांना कोपरगाव शहर सोडून जाण्यास भाग पाडले होते.तर अनेकांचे संसार मातीमोल झाले होते.अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धारणगाव रस्त्यावर रांगोळ्या काढून आपल्या राजकीय पोळी भाजल्या हि बाब जनता विसरली नाही.त्यावर अनेकांनी विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या.आधी याबाबत उध्वस्त व्यापाऱ्यांनी संघटना काढली होती.मात्र त्यांच्या मागण्यांकडे अनेकांनी कानाडोळा करण्यात समाधान मानले होते.बिचारे बरेचजण या आशेपोटी परागंदा झाले आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन नगरसेवक अपात्र ठरविण्यासाठी सुरु असलेल्या सुनावणीत अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांचे अतिक्रमण सुरूच असल्याच्या पार्श्वभूमीवर ते युद्ध पातळीवर हटविण्याची मोहीम मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाले होते.मात्र सदर दौरा संपल्यावर हि मोहीम इतिहास जमा झाली त्याचा विषय कोणीही हाताळला नाही.”आधी मोठ्या धेंडांचे अतिक्रमण काढा,मग आम्ही काढतो” या दोषारोपात हि अतिक्रमणाची राळ पुन्हा खाली बसली जाते.त्यात निवडणुका आल्या की त्या अतिक्रमणधारकांना आश्वासने दिले जातात मात्र प्रस्थापितांच्या कथनी आणि करणी यात मोठे अंतर आढळत आहे.

“कोपरगाव नगरपरिषद हद्दीत मोठया प्रमाणावर अवैध व्यावसायिक असून त्यांच्या मूळे कायदा सुव्यवस्था निर्माण होत असेल तर नगरपरिषद प्रशासन आणि पोलिसांनी त्यांना हटविले पाहिजे व अवैध व्यावसायिकांकडून हप्ताखोरी करणारे आजी-माजी पदाधिकारी उघड केले पाहिजे त्यासाठी आपला पालिकेला त्यासाठी पाठिंबा राहील”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

राज्य परिवहन मंडळाचे कोपरगाव बसआगार मंजूर करताना या व्यापारी संकुलाची मोठी जागा आहे हे अनेकांच्या ध्यानात आणूनही त्याकडे सोयीस्कर कानाडोळा करण्यात आला होता.मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कोपरगाव दौऱ्यात या बाबत आश्वासन दिले होते त्या नुसार दि.१४ एप्रिल २०२२ रोजी मंत्रालय पातळीवर मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक घेतल्याने अनेक विस्थापितांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.मात्र त्यानंतर या मोहिमेचे काय झाले हे कोणालाही समजेनासे झाले आहे.आता बहुधा निवडणुका आल्यावर हा विषय ऐरणीवर येईल असे दिसत आहे.

दरम्यान लोकसभेच्या स्थायी समितीने राष्ट्रीय फेरीवाला धोरणात काही सुधारणा केल्यानंतर विधेयकाला मंजुरी मिळाली होती.त्यानंतर प्रत्येक राज्याने आपल्या अखत्यारितील महापालिकांना व पालिकांना त्यांचे धोरण आखण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.त्यानुसार या धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली होती.कोपरगाव शहरातील कोपरगाव शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न लक्षात घेऊन,तसेच रहदारीला होणाऱ्या अडथळा कमी करण्याच्या उद्देशाने विक्री ना-विक्री प्रक्षेत्र ठरविणे,नगर पथ विक्रेता ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र वाटप,शुल्क व आकार,कल्याणकारी योजनांचा लाभ मिळून देणे आदी अनुषंगिक बाबीच्या नियोजना करिता सदर समितीची बैठक संपन्न झाली होती.कोपरगाव शहरात लवकरच विक्री प्रक्षेत्राची आखणी करणे कामी नगरपरिषदेच्या नगररचना विभागा कडून कार्यवाही केली जाईल आणि त्या ठिकाणी विस्थापीत पथ विक्रेत्यांचे पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दि.०३ जून २०२२ रोजी एका कार्यक्रमात बोलताना दिले होते.मात्र त्या पातळीवर अद्याप शुकशुकाट असल्याचे दिसत आहे.सदर सर्वेक्षणामध्ये वंचित पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण देखिल लवकरात लवकर केले जाईल.सर्वेक्षण पूर्ण झाले नंतर पथ विक्रेता यादी प्रसिध्द करण्यात येईल.या यादीच्या आधारे पथ विक्रेता प्रतिनिधींची स्थायी नगर पथविक्रेता समिती मतदानाच्या माध्यमातून तयार करण्यात येईल.तसेच नोंदणीकृत पथ विक्रेतांना विक्री प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल अशा बऱ्याच लोकप्रिय घोषणा ऐकायला भेटल्या होत्या.मात्र त्यानंतर कोणती कार्यवाही झाली याबाबत कोणालाही काही माहिती नाही हे विशेष !

“कोपरगाव नगरपरिषद हद्दीत मोठया प्रमाणावर अवैध व्यावसायिक व टपरीधारक असून त्यांच्या मूळे कायदा सुव्यवस्था निर्माण होत असेल तर नगरपरिषद प्रशासनाने त्यांना हटविण्याची मोहीम सुरु केली तर त्यांना आपण पोलीस बळ पूरविण्यास तयार आहे”-रामराव ढिकले,पोलीस निरीक्षक,कोपरगाव शहर पोलीस ठाणे.

परिणामस्वरूप कोपरगाव बस स्थानक परिसर,धारणगाव रस्ता,खुले नाट्यगृह,येवला रोड,अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या मागील भाग,स्टेशन रोड,गांधी चौक,सुदेश चित्रपट गृहाचा परिसर आदी ठिकाणी पुन्हा एकदा कोपरगाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी रहदारी धोक्यात आली आहे.महिलांना वावरणे अवघड बनले आहे.याबाबत कोणीही काहीही मनावर घेईनासे झाले आहे.परिणाम स्वरूप काही बेताल आजी-माजी नगरसेवक आणि गुन्हेगार वृत्तीचे नागरिक काही संघटनांचा आधार घेऊन राजरोस टपऱ्या ठेवण्यास प्रोत्साहित करताना दिसत असून त्यांच्या कडून पतसंस्थांच्या कर्ज वसुली सारखे रोज सायंकाळच्या वेळी किंवा सकाळी १००-४०० रुपयांपर्यंत हप्ते गोळा करताना दिसत आहे.यातून नगर परिषदेचा मोठा महसूल बुडत आहे.याकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.मात्र नुसता महसुलाचा प्रश्न नाही तर या ठिकाणी गुरखे आणि अन्य अवैध व्यवसाय वाढून त्यातून अनेक टवाळखोरांचे टोळके टपरीवर थांबून अनेक गुन्हे घडत आहे.महिला सुरक्षित राहिल्या नाहीत.त्यांच्या आडून अनेक चोऱ्या वाढल्या आहेत.त्यातून गुन्हेगारी वाढत असून शहर पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे.परिणामस्वरूप शहरातील शांतता धोक्यात आली आहे.व्यापारी महासंघाने शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी व चौकात चलचित्रण करणारे कॅमेरे बसविण्याचे ठरवले होते.मात्र सदर योजना पुढे का सरकली नाही हा संशोधनाचा विषय ठरावा.याबाबत बजरंग दलाचे कार्यकर्ते रविकिरण ढोबळे या याबत पाठपुरावा करत असताना दिसत आहे मात्र त्यांच्या मागणीकडे लक्ष देण्यात कोणालाही वेळ मिळत नाही हे विशेष ! नुकताच धारणगाव रोडलगत काही असामाजिक तत्वांनी काही वैध व्यावसायिकांना धमकावले असल्याचे प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणी पोलिसांत नोंद झाली असल्याचीही माहिती हाती आली आहे.त्यामुळे हा प्रश्न कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मनावर घेऊन त्याचे निर्मूलन करणार आहे का ? व त्यांना पोलीस प्रशासन मदत करणार आहे का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने विरोधी गटाचे गट नेते विरेन बोरावके यांचेशी भ्रमणध्वनींव्दारे संपर्क साधला असता तो स्थापित होऊ शकला नाही.

Related Articles

2 Comments

  1. कोपरगाव ग्रा मीण मधे खुप अतिक्रमण आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close