कोपरगाव शहर वृत्त
शहर विकासासाठी निधी कमी पडणार नाही-…या नेत्याचे आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील विविध विकास कामांचे शासनाकडे प्रस्ताव दाखल केले असून त्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.कोपरगाव शहराच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.कोपरगाव शहराचा सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी प्रत्येक प्रभागाचा नियोजनबद्ध विकास केला जाईल असे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना दिले आहे.

“कोपरगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी आणि नागरीकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीआपण कटिबद्ध आहे.महायुती सरकारच्या माध्यमातून व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माध्यमातून मोठा निधी आणणार आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
राज्यातील महानगरपालिका,नगरपालिका,जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला दोनच दिवसापूर्वी मुदतवाढ दिली आहे.त्यानुसार आता राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.मात्र,ही मुदत आता संपत आली असूनही एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही.यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली.त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेतील विलंबाविषयी जाब विचारला आहे.परिणामस्वरूप सरकार गडबडले आहे.त्यामुळे सरकारी पक्षातील आमदार आणि खासदारांनी आपल्या मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मधील निवडणुकांना कसे सामोरे जायचे याची तयारी सुरू केली असून उद्घाटनाचा तडाखा सुरू केला असल्याचे दिसून येत आहे.आपापल्या कार्यकर्त्यांना जागते रहोचा हुकूम सोडला आहे.तोफा,नाल,घोडे,तंग तोबरा,सरदार,दरकदार,बारगीर आदींना सज्ज राहण्यास फर्मावले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर त्याला अपवाद नाही.सर्वच पक्षांनी आपल्या तलवारी परजल्या आहेत.त्याची अनुभूती शहरात येऊ लागली आहे.
परीणाम स्वरूप आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील प्रभाग क्र.०५ मध्ये ५१.५७ लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन नुकतेच केले यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
या विकास कामांमध्ये सूर्यकांत कहार घर ते अजय लचुरे घरापर्यंत भूमिगत गटार करणे,बिलाल शेख घर ते धुमाळ सर घर ते डंबीर दुकानापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवणे,रामदास लकारे घर ते विलास भांगरे घरापर्यंत भूमिगत गटार करणे,अंबिका भोजनालय ते सागर भगत घरापर्यंत भूमिगत गटार करणे, राहुल देवळालीकर घर ते वेसपर्यंत भूमिगत गटार करणे,श्री मारुती मंदिर ते नरोडे रेशन दुकानापर्यंत भूमिगत गटार करणे,दारुंटे घर ते दत्तपारपर्यंत भूमिगत गटार करणे,माळी काकू घर ते रिंकू खडांगळे घरापर्यंत भूमिगत गटार करणे आदी कामांचा समावेश आहे.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी आणि नागरीकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीआपण कटिबद्ध आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माध्यमातून मोठा निधी आणणार आहे.कुठलाही भेदभाव करणार नाही.कोपरगावकरांच्या आशीर्वादाने तो निश्चीतपणे पूर्ण करील असा विश्वास आ.काळे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.