कोपरगाव शहर वृत्त
डॉ.आंबेडकर जयंती निमित्त…या शहरात विविध कार्यक्रम
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधत आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने रविवार दि.२१एप्रिल रोजी कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर ‘आदर्श शिंदे नाईट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या गाण्याच्या मैफिल रंगणार असल्याची माहिती हाती आली आहे.
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला भीम सैनिकांना ओढ लागते भीम गीतांच्या कार्यक्रमांची.यावर्षी कोपरगाव मतदार संघातील असंख्य भीम सैनिकांची आ.काळे यांच्याकडे मागणी होती की,डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे लाडके महागायक-संगीतकार आदर्श शिंदे यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करावा. तमाम भीम सैनिकांची मागणी लक्षात घेवून आ.आशुतोष काळे यांनी यावर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करून हि देखील मागणी पूर्ण केली आहे.
आदर्श शिंदे हे संगीत क्षेत्रातील आघाडीवर असलेले नाव आहे.त्यांनी अनेक भीम गीतांबरोबरच चित्रपट गीते,लोक गीते गायली असून शिंदे कुटुंबाचा संगीताचा वारसा पुढे चालवितांना अनेक गीतांना संगीतबद्ध केले असून त्यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमांना दरवर्षी मोठी मागणी असते.भीम गीताच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार आणि महत्त्व मांडले गेले आहे.असंख्य भीमगीतांची निर्मिती आजवर झाली असून दरवर्षी अनेक भीमगीते प्रदर्शित होत असतात.बहुतांश सर्वच भीमगीते ही मराठी भाषेत असल्यामुळे नेहमीच भीम गीतांच्या कार्यक्रमांना लहान-थोर भीम सैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो.
त्यामुळे नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आ.काळे यांच्या संकल्पनेतून प्रथमच गायक आदर्श शिंदे यांच्या भिमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे या कार्यक्रमासाठी देखील मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून कोपरगाव शहरासह तालुक्यातून मोठा भिमसागर लोटणार आहे.त्यामुळे रविवार दि.२१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाची आ.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ व भीम सैनिकांच्या वतीने जय्यत तयारी सुरु करण्यात आली असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने दिली आहे.