कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहरासाठी आणखी एक व्यापारी संकुल-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या व आगामी काळात आर्थिक प्रगतीला चालना देण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या कोपरगाव बस स्थानकाच्या व्यापारी संकुलाबरोबरच कोपरगाव शहरात नगरपरिषदेसमोर अडीच कोटीचे आणखी एक दोन मजली व्यापारी संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दिली आहे.
कोपरगाव बस स्थानकाची उभारणी करतांना संगमनेर बस आगारा प्रमाणे चौफेर व्यापारी संकुल उभारणे गरजेचे होते.मात्र त्या कडे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सोयीस्कर कानाडोळा केला होता.त्यावरून त्यांच्यावर शहरातून मोठी टीका झाली होती.त्यावर शहरात मोठे रणकंदन झाले होते.तो धागा पकडून व आ.काळे यांनी पाठपुरावा सुरु केला होता.त्याचा पाठपुरावा करून कोपरगाव बस स्थानकाच्या लगत असलेल्या परिसरात व्यापारी संकुलासाठी त्यांनी मंजुरी मिळवून व्यापारी संकुलाच्या १४ कोटीच्या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे लवकरच सुसज्ज व्यापारी संकुल उभे राहणार आहे.त्याचबरोबर केंद्र शासनाच्या भांडवली खर्च योजने अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेला अडीच कोटीचे आणखी एक व्यापारी संकुल मंजूर झाले आहे.
त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,नगर रचनाकार किरण जोशी,आर्किटेक्ट अचल राजे आदी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून दोन मजली असलेल्या या अडीच कोटीच्या व्यापारी संकुलाच्या नियोजित आराखड्या बाबत सविस्तर चर्चा केली.
दरम्यान यात पहिला व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी एकूण १५ व्यापारी संकुल बांधण्यात येणार असून पार्किंग व्यवस्था त्याबरोबरच नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा बाबत माहिती जाणून घेवून उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.तसेच यापूर्वी पोस्ट ऑफिस जवळ आणि बाजार तळ याठिकाणी वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत दोन व्यापारी सकुल मंजूर करण्यात आले आहे.त्याच्याही निविदा लवकरच प्रसिद्ध होणार असून कोपरगाव शहरातील ज्या परिसरात मोकळी जागा आहे त्या परिसरात व्यापारी संकुल उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.