उद्योग
उद्योगांनी रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या-उद्योगमंत्री
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शिर्डी येथील एमआयडीसी व डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे, उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केली आहे.
सावळीविहीर येथे शिर्डी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औद्योगिक वसाहतीचे व डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन उद्योगमंत्र्यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे,आ.आशुतोष काळे,माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के,शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,निबे लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी उद्योगमंत्री पुढे बोलताना म्हणाले की,”येत्या काळात राज्यात पाच ठिकाणी डिफेन्स क्लस्टर सुरू करण्यात येणार आहेत.यातील एक डिफेन्स क्लस्टर शिर्डी औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यात येत आहे. या डिफेन्स कलस्टरच्या माध्यमातून १ हजार २०० कोटींची गुंतवणूक होणार आहे.येत्या काळात शिर्डी बरोबर कोपरगाव शहरातही औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.
राज्य शासनाचे धोरण उद्योगस्नेही आहे.महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ३० हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प सुरू होत आहे.यात ८० टक्के स्थानिक तरूणांना परदेशात प्रशिक्षण देऊन या प्रकल्पात कायम नोकरी दिली जाणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
त्यावेळी मंत्री विखे म्हणाले की,”एम.आय.डी.सी.शिर्डी व परिसरातील युवकांसाठी नवा आशेचा किरण आहे. या माध्यमातून हजारो तरूणांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे.कोपरगावात एमआयडीसी उभारण्यासाठी शेती महामंडळाची ३०० एकर जागा विनाशूल्क उपलब्ध करून दिली जाईल असे त्यांनी सांगितले.
शिर्डी एमआयडीसीमुळे शिर्डी,राहाता, कोपरगाव या परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शिर्डी श्री साईबांबा देवस्थान म्हणून जगभर ओळखले जाते.यापुढे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग येणार असल्याने एक ‘औद्योगिक हब’ म्हणून उदयास येईल असा विश्वासही पालकमंत्री श्री.विखे यांनी यावेळी शेवटी व्यक्त केला आहे.
आ.आशुतोष काळे यांचेही यावेळी भाषण झाले.प्रास्ताविक गणेश निबे यांनी केले.
अशी साकारणार शिर्डी एम.आय.डी.सी : –
सावळीविहीर (ता.राहाता) येथील शेती महामंडळाच्या ५०२ एकर जागेवर शिर्डी एमआयडीसी साकारणार आहे.राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु.व सावळीविहीर खु.तसेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे या गावांच्या क्षेत्रात एमआयडीसीची जागा आहे.शासनाच्या जमिनीवर भूसंपादनाविना विकसित करण्यात येणारी ही राज्यातील पहिलीच एमआयडीसी ठरणार आहे.रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांची मान्यता यापूर्वीच देण्यात आली आहे.शिर्डी औद्योगिक वसाहतीचे हे ठिकाण शिर्डी शहरापासून ५ किलोमीटर,समृद्ध महामार्गाच्या इंटरचेंजपासून केवळ ३ किलोमीटर व साईबाबा (शिर्डी) आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १४ किलोमीटर अंतरावर आहे.रेल्वेमार्ग,रस्तेमार्ग तसेच हवाईमार्गाने देशभरातील सर्व प्रमुख शहरांना अत्यंत सुलभतेने जोडणारी औद्योगिक वसाहत म्हणूनच भविष्यात उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद अपेक्षित असल्याचे एमआयडीसी प्रशासनाचे म्हणणे आहे.
डिफेन्स क्लस्टरचे वैशिष्ट्य :-
शिर्डी एमआयडीसीत आज डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन करण्यात आले.एमआयडीसीच्या २०० एकर जागेत हे क्लस्टर साकार होणार आहे.पुणे स्थित निबे लिमिटेड ही संरक्षण सामग्रीची निर्मिती करणारी कंपनी या क्लस्टरमध्ये पहिला कारखाना उभारणार आहे.या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे हे राहाता तालुक्यातील भूमिपुत्र आहेत.यामाध्यमातून एक हजार कोटींची गुंतवणूक होणार असून या क्लस्टरमध्ये शिर्डी व परिसरातील २ हजार तरूणांना थेट नवीन रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.