आंदोलन
वाहन योग्यता प्रमाणपत्र दंड रद्द,वाहनधारकांकडून स्वागत !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले होते.योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास ५० रुपये प्रतिदिन याप्रमाणे दंड आकारला जात होता.त्याविरोधात ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांनी व त्यांच्या संघटनांनी आवाज उठवला होता.दररोज पन्नास रुपये दंड आकारण्यात येत होता.तो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला असल्याने कोपरगाव शहरातील रिक्षा संघटनेने त्याचे स्वागत केले आहे.
रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट (योग्यता प्रमाणपत्र) अनिवार्य असते.मात्र,अनेक वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात.वेळेवरती त्याची तपासणी करून घेण्यास टाळाटाळ केली जाते.मात्र आता,योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास पन्नास रुपये प्रतिदिन याप्रमाणे दंड आकारला जाणार असल्याचे परिवहन विभागाने जाहीर केले होते.राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याबाबत कार्यवाही करण्यास सुरुवात करण्यात आली होती.शहरातील वाढत्या अपघात आणि नियमांची उल्लंघन यावर नियंत्रण राखणे यामुळे सोपे जाणार असल्याचे मानले जात होते.
शहरामध्ये वाहतूक त्याचप्रमाणे प्रवासी वाहनांना वेळोवेळी फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण करणे आवश्यक असते.त्याबाबत आर.टी.ओ.च्या वतीने अशा वाहनधारकांना वेळोवेळी कळवण्यात येते.तसेच,आर.टी.ओ.च्या वायुवेग पथकाकडून वाहन तपासणीमध्ये अशी वाहने आढळून आल्यास त्यावरती कारवाई करण्यात येते.अनेक वेळा वाहने अटकावून देखील ठेवण्यात येतात.दरम्यान,नव्या आदेशानुसार आता वाहन चालकाकडून फिटनेस थकल्यास अथवा त्यांनी ही तपासणी करण्यास टाळाटाळ केली तर त्याच्या विलंबाबाबत आता अतिरिक्त ५० रुपये प्रतिदिन दंड आकारला जाणार होता.त्यानुसार फिटनेस शुल्कासोबत त्या वाहनचालकाला विलंब दिवसाचे प्रतिदिन ५० रुपये आकारले जाणार होते.त्यामुळे वाहन मालकांत आणि चालकांत मोठ्या प्रमाणावर नाराजी वाढली होती.याबाबत राज्यातील वाहन मालकांनी आवाज उठवला होता व राज्यात ठिकठिकाणी ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली.
दरम्यान याबाबत कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना तसेच रिक्षा सेनेच्या वतीनेही काही दिवसांपूर्वी कोपरगाव येथील तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना फिटनेस लेट दंडा विरोधात निवेदन देण्यात आले होते.राज्यातील या बंद विरोधाची दखल परिवहन विभागासह राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती.परिणामी त्यांनी पन्नास रुपये प्रतिदिन प्रमाणे आकाराला जाणाऱ्या नियमाला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.सदर स्थगितीमुळे रिक्षा चालकांना दिलासा मिळाला असून कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना तसेच रिक्षा सेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यात येऊन त्यांच्या अभिनंदनाचा ठरावा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक कैलास जाधव,दत्ता काले,प्रकाश शेळके,पापा तांबोळी,रवींद्र वाघ,राजू कोपरे,नवशाद शेख,रंजीत पंडोरे,अनिल वाघ,राजू नावडकर यांच्यासह कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.