आंदोलन
रस्त्याची दुरावस्था,विविध संघटनांच्या वतीने,’ रास्ता रोको’
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तीर्थंक्षेत्र शनी-शिंगणापुरसाठी जवळचा ठरणारा व वेळ व पैसा वाचविणारा शिर्डी-शनी शिंगणापूर या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत असून अनेकांची जीवित व वित्तीय हानी होत असल्याने व त्याकडे लक्ष वेधूनही सार्वजनिक बांधकाम दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती व जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने दि.०४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दत्तनगर फाटा येथील पोलीस चौकी समोर,’रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे व रुपेंद्र काले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
‘उत्तर नगर जिल्ह्यातील नेते बडे आणि त्यांचे व्यवहार खोटे’ अशी नवीन म्हण अलीकडील काळात प्रचलित झाली आहे.त्यातील प्रमुख रस्ता नगर-मनमाड या त्याचा जिताजागता पुरावा म्हटला पाहिजे,त्या पाटोपाठ तळेगाव दिघे मार्गे संगमनेर-कोपरगाव याचा क्रमांक लागत असून त्यापाठोपाठ गणेशनगर मार्गे श्रीरामपूर या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.त्याकडे स्थानिक शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक रुपेंद्र काले,व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र संवेदनशीलतेचा अभाव असलेले नेते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कानावर हात असल्याने त्यांची हि मागणी कधीही त्यांच्यापर्यंत जाताना दिसत नाही.त्यामुळे नगर-मनमाड जसे बळी जात राहिले प्रवासी आणि माल वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान होत राहिले तशीच अवस्था या शिर्डी-शनीशिंगणापूर या रस्त्याची झाली आहे.हा मार्ग श्रीरामपूरच्या दिशेने या मतदार संघात तर गणेशनगर परिसर हा राहाता (शिर्डी) व कोपरगाव विधानसभा मतदार संघात येतो.मात्र या रस्त्यास अनुक्रमे आ.लहू कानडे,महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे,तर कोपरगाव विधानसभा मतदार संघात तीन पिढ्या जे घराणे नेतृत्व करत आहे ते आ.आशुतोष काळे आदी तीन बडे नेते व चौथे खा.सदाशिव लोखंडे नेतृत्व करत असताना कोणीही वाली उरल्याचे दिसत नाही.या बाबत केवळ निवडणुका आल्या तरच माही मंडळी हयात असल्याचे दाखवत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.एरव्ही वर्तमानपत्रात हि मंडळी,’हरवले आहे’ अशा आशयाच्या बातम्या दुर्दैवाने मतदारांना वाचाव्या लागत असल्याचे चित्र आहे.आता निवडणुका जवळ आल्याने हि मंडळी भलतीच जागृत असल्याचे दिसत असून अनेकांचा वाढदिवस नसताना आपल्या हयातीचा पुरावा देण्यासाठी ‘तो’ करण्याची हौस भागवावी लागत आहे.राहाता मतदार संघाची अवस्था तर, ‘नाव मोठे लक्षण खोटे’ अशीच दिसून येत आहे.गणेश सहकारी साखर कारखान्यात पराभव झाल्यापासून हि मंडळी झोप गमावून बसली आहे.वास्तविक या मार्गाने या कारखान्यासह अशोक,प्रवरा आदी सहकारी साखर कारखान्याची सर्वाधिक अवजड ऊस वाहतूक होत असते.मात्र मतदारांना वेळेला उपाशी ठेवून व आपली गरज आली की हि मंडळी आता,फुकटचे देवदर्शन’ आणि ‘साखर’ पेरणी करण्याचे कसब दाखवताना दिसत आहे.त्याला निर्लज्ज मतदार दुर्दैवाने भुलताना दिसत आहे.घात नेमका तिथेच होताना दिसतो.तरीही हि मंडळी जवळपास आठ-दहा दशकाहून शहाणपण शिकण्याचे नाव घेताना दिसत नाही.’तीच काडी आणि तेच औषध’,त्यामुळे ‘या’ मतदारांची ‘या’ नेत्यांनी चव ओळखून घेतली आहे.तेथेच घोडे पेंड खाताना दिसत आहे.मात्र त्यातून बोध घेतील ते मतदार कसले ? असेच गेली अनेक दशके,”ये रे माझ्या मागल्या” प्रकरण चालू आहे.मात्र समाधानाची बाब हि की,शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती यांनी याबाबत मनावर घेतले आहे.त्यांनी वांरवांर पाठपुरावा करून त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.त्यासाठी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना २८ डिसेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष भेटून,’ प्रहार जनशक्ती पक्ष’ व ‘शेतकरी संघटने’च्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते.व त्याआधी वर्षभरापासून पाठपुरावा करूनही त्यास नाठाळ सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने केराची टोपली दाखवली होती.अखेर संतापून त्यांनी आगामी ०४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दत्तनगर फाटा येथील पोलीस चौकी समोर,’रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.त्यामुळे प्रशासनास बुडबुडा आला आहे.
दरम्यान या प्रकरणी ‘प्रहार’चे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी आ.बच्चु कडू यांच्या मदतीने हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी पाठपुरावा केला असून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांची,’ना हरकत’ घेऊन रस्ते सचिव मंत्रालय मुंबई यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग होण्यासाठी प्रलंबित असल्याची माहिती दिली आहे.पोटे यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याबाबत अनेक वेळा चर्चा करून पाठपुरावा केला आहे.मात्र “सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग होणे शक्य नाही” अशी बतावणी या विभागाकडून होत आहे.त्यामुळे या दोन्ही संघटनांनी वैतागून एकत्र येत जनतेला दररोज होणाऱ्या त्रासातून सोडवण्यासाठी श्रीरामपूर संगमनेर महामार्गावर श्रीरामपूर एम.आय.डी.सी.येथील दत्तनगर फाटा पोलीस चौकी समोरच दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता,’रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी धनगरवाडी,वाकडी,गणेशनगर आदी परिसरातील वाड्यावर वस्त्यावरील नागरिक विद्यार्थी प्रहार व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या आंदोलनाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.