अपघात
वादळी पावसाचा तडाखा,एक गायीसह तीन मेंढ्या ठार
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात अवकाळीने थैमान घातले असून काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने बक्तरपूर परीसरात वीज पडून एक गायीसह तीन मेंढ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.एका बाजूला उष्णता आहे तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस कोसळत आहे.दरम्यान हा अवकाळीचा जोर राज्यात आणखी राज्यातील विविध भागात पुढील आठवडाभर म्हणजे १८ मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.कोपरगाव तालुक्याच्या संवत्सरसह पूर्व भागाला चांगले झोडपले असून विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्यामुळे संवत्सर,कोकमठाण या ठिकाणी अनेक नागरिकांच्या घराचे पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी व्यापारी गाळे उडून मोठे नुकसान झाले आहे.तर काही ठिकाणी मोठ मोठे वृक्ष विजेच्या तारांवर पडल्यामुळे वीज प्रवाह देखील खंडित झाला होता.तर काल दि.१४ मे रोजी दुपारी झालेल्या पावसाने बक्तरपूर शिवारात पडलेल्या विजेमुळे एक गाय व तीन मेंढ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या मेंढ्या अन्य भागातील असल्याची माहिती आहे.या शिवाय चासनळी येथील बाळासाहेब देवराम चांदगुडे यांच्या वस्तीचे पत्रे उडून गेले असून त्यांच्या प्रपंच रस्त्यावर आला आहे.
दरम्यान मागील एक महिन्यापासून उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना झालेल्या पावसामुळे तात्पुरता थंडावा मिळाला असला तरी काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असल्याचे व काही मेंढ्या आणि गायींचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान घटनास्थळी बक्तरपूर येथील सरपंच मुक्ताबाई नागरे,ग्रामसेवक श्री.तडवी,तलाठी डी.बी.विधाते,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद कराडे आदींनी भेट दिली असून घटनेचा पंचनामा केला आहे.