जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

साईभक्त महिलेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू,दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा-मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून साकारण्यात आलेल्या साई पदयात्रींसाठीच्या स्वतंत्र पालखी मार्गाचे काम कोपरगाव तालुक्यात रखडले आहे.या रखडलेल्या कामामुळे सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील साईभक्त महिलेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.या अपघातात महिलेसोबत चालणाऱ्या आणखी दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

“साईभक्त महिलेच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक भाऊसाहेब साळुंखे यांना दोषी धरावे व त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा.अन्यथा पाथरे व परिसरातील नागरिक आंदोलन करतील-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते,कोपरगाव.

  मंगळवारी सकाळी पाथरे येथून साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गावातील महिला व पुरुष पालखीसोबत शिर्डीच्या दिशेने जात होते.दुपारी दीड वाजेच्या सुमारास पदयात्री कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात असलेल्या हॉटेल साई मुकुंद जवळून जात होते.या ठिकाणी सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या पालखी मार्गाचे काम रखडले आहे त्यामुळे पालखीसोबत सर्व पदयात्री मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत होते.यावेळी पाठीमागून भरधाव आलेली दुचाकी रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या साई भक्तांच्या अंगावर आली. दुचाकीने धडक देऊन केलेल्या अपघातात तीन महिला गंभीर जखमी झाल्या.त्यांना पालखीसोबत असलेल्या श्रीराम मंडळाच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान एका महिलेचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन अति रक्तस्राव झाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. अनिता दशरथ दवंगे असे मृत महिलेचे नाव आहे.त्यांच्यासोबत असलेल्या सरला गणपत दवंगे व कांता दिलीप चिने या महिलांना देखील गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तीनही महिला पाथरे येथील रहिवासी आहेत.


दरम्यान अपघात घडल्यानंतर पालखीसोबत असलेल्या भाविकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या गलथनपणाबद्दल संताप व्यक्त केला.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सिन्नर-शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरण करतानाच पदयात्रींसाठी स्वतंत्र पालखी मार्गाची आखणी केली आहे.सिन्नर तालुक्यात हा महामार्ग पूर्ण झाला असला तरी कोपरगाव तालुक्यात बहुतांश ठिकाणी पालखी मार्गाचे काम रखडलेले आहे.अपघात घडला त्या ठिकाणी देखील हीच परिस्थिती असल्याने पदयात्रींना मुख्य रस्त्यावर यावे लागले.


महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा….

कोट्यवधी रुपये खर्च करून सिन्नर शिर्डी महामार्ग बनवण्यात आला.मात्र प्रवासी व पायी चालणाऱ्या साई भक्तांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.महामार्गाच्या प्रकल्प आराखड्यातील बहुतांश कामे अर्धवट आहेत.खोपडी व पाथरे येथे भक्तनिवास बांधले मात्र त्याचा दोन वर्षांपासून वापर होत नाही. महामार्गावर ठिकठिकाणी विद्युतीकरण करण्यात आले असले तरी वेळेवर विज बिल भरले जात नसल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येतो.महामार्गावरची टोल वसुली मात्र दणक्यात सुरू आहे.साईभक्त महिलेच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक भाऊसाहेब साळुंखे यांना दोषी धरावे व त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा.अन्यथा पाथरे व परिसरातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा संजय काळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close