धार्मिक
शिर्डीत आषाढी एकादशी उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने ‘आषाढी एकादशी’ हा स्थानिक उत्सव म्हणून साजरा करण्यात आला असून या निमित्ताने भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.याबरोबरच या निमित्ताने श्रींचे समाधी मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.हा उत्सव शिर्डीसह सर्वत्र साजरा करण्यात येतो.
आषाढ शु ।।११ शके १९४४ हा दिवस आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते.या दिवसाचे महत्व लक्षात घेवुन संस्थानच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो.या निमित्ताने संस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये रात्रौ ०८ ते ०९ यावेळेत मंदिर कर्मचारी उल्हास वाळुंजकर यांचे कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराच्या स्टेजवर संपन्न झाला. तसेच रात्रौ ०९.१५ वाजता श्रींचे पालखीची शिर्डी गावातुन मिरवणुक काढण्यात आली.
यावेळी संस्थानचे विश्वस्त,अधिकारी, मंदिर पुजारी,कर्मचारी,शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर रात्रौ १० वाजता श्रींची शेजारती करण्यात आली.
आषाढी एकादशी निमित्त संस्थानच्या वतीने श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ५० हजार भाविकांनी या खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतला. याकरीता संस्थानच्या वतीने सुमारे ६० पोते साबुदाणा, ४० पोते शेंगादाणे,७५० किलो तुप व सुमारे ११०० किलो बटाटे आदि साहित्यांचा वापर करण्यात आला. तसेच आषाढी एकादशी निमित्ताने कर्नाटक येथील देणगीदार साईभक्त एस.प्रकाश यांच्या देणगीतुन श्री साईबाबा समाधी मंदिर,व्दारकामाई, चावडी व गुरुस्थान आदी ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.