कोपरगाव शहर वृत्त
…या शहरात पोलिसांची बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आगामी बकरी ईद आणि एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि शहरातील खाटीक समाजातील नागरिक यांची संयुक्त बैठक आज सकाळी ११ वाजता संपन्न झाली असून यात गोवंश वगळता अधिकारिक प्राण्यांची कुर्बानी द्यावी व शांतता राखावी असे आवाहन पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे.

“आमचे सहकारी दोषी असतील तर कारवाई मान्य असेल पण आम्ही गोवंश वगळता अन्य अधिकृत म्हैस वर्गीय प्राण्यांची कुर्बाणी देत असू तर कोणी कारवाईचा आग्रह धरू नये”-अस्लम शेख,माजी शहर प्रमुख शिवसेना,कोपरगाव शहर.
कोपरगाव शहरात हिंदू संघटनांसह विविध संघटनांचा गोवंश हत्येला मोठा विरोध होऊनही अद्यापही बैल बाजार रोड लगत असलेल्या आयेशा कॉलनी येथे गोवंश हत्या सुरूच असल्याची बाब नुकतीच पुन्हा एकदा कासली फाटा या ठिकाणी उघड झाली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात गोवंश हत्या ही चिंतेची बाब ठरत आली आहे.त्यामुळे समाजमन कलूषित होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.त्यामुळे आगामी शनिवारी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद आणि भागवत एकादशी आदी तिथी एकाच दिवशी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी दक्षता मोहीम सुरू केली आहे.बकरी ईद सणा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी पोलिसांकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यात गाय,वळू आणि बैलांची कत्तल करण्यास मनाई आहे.जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाय केले जात आहेत.त्या अंतर्गत आज सकाळी ११ वाजता पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली असून त्यांनी कायदा सर्व नगिरकानी पाळावा कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये असे आवाहन केले आहे.त्यावेळी त्यांनी शहरातील गोरक्षक संघटनांचे पदाधिकारी यांचीही बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मथुरे यांनी दिली आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव तहसीलच्या नायब तहसीलदार चंद्रशेखर कूलथे,नगरपरिषद आरोग्य निरीक्षक सुनील आरण,पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे,दिपक रोठे,यांचे सह कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,फकीर कुरेशी,शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अस्लम शेख,पप्पू सय्यद आदीस कुरेशी समाजातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी अस्लम शेख,मेहमूद सय्यद,रियाज शेख आदींनी चर्चेत सहभाग नोंदवला आहे.आमचे सहकारी दोषी असतील तर कारवाई मान्य असेल पण आम्ही गोवंश वगळता अन्य अधिकृत म्हैस वर्गीय प्राण्यांची कुर्बाणी देत असू तर कोणी कारवाईचा आग्रह धरू नये अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.उपस्थितांचे पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे यांनी आभार मानले आहे.