निवडणूक
कोपरगावात सहाव्या दिवशी अनेक नामनिर्देशन दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास २३ डिसेंबर सुरुवात झाली आहे.नामनिर्देशन पत्र भरण्याच्या आज सहाव्या दिवशी कोपरगाव तालुक्यातील विविध नऊ ग्रामपंचायतीत ४५ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
दाखल झालेल्या अर्जाची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल.नामनिर्देशनपत्रे ०४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ०५.३० या वेळेत होईल.मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.
राज्यातील १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी,भाजप,मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे.त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार आहे.मात्र सरपंचाचे आरक्षण नंतर जाहीर होणार असल्याने ग्रामपंचायतीची रया गेल्याचे दिसत आहे.व खर्च करण्यासाठी जो-तो एकमेकांकडे पाहत आहे.तसा कोपरगावात हा खेळ साखर सम्राटांना नवा नाही त्यामुळे या तालुक्यात फार काही निष्पन्न होण्याची शक्यता कमीच आहे.
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जात असून सलग तीन दिवस सुट्या असल्याने आज सहाव्या दिवशी नामनिर्देशन स्वीकारण्यास प्रारंभ केला होता.शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.असे आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले होते.त्यामुळे तीन दिवस हि प्रक्रिया बंद होती.तिला आज सह्यांच्या दिवशी गती आली आहे.
आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रात प्राप्त अर्ज पुरुष व पुढे स्रिया दर्शविल्या असून पुढे शेवटी आलेले एकूण अर्ज दर्शवले आहेत.
घारी-००-स्रिया-०१,एकूण-०१,वेळापूर -०५-०४ एकूण-०९,जेऊर पाटोदा-००-३-०३,संवत्सर-०५-०२-०७,मढी खुर्द-०१-०१-०२,मढी बु.०६-०८-१४,कोकमठाण-००-०१-०१,जेऊर कुंभारी-०३-००-०३,एकूण पुरुषांचे आलेले अर्ज-२५,स्रिया-२० असे एकूण ५४ नामनिर्देशन दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यानी दिली आहे.तर उक्कडगाव,तीळवणी.अंजनापूर,मनेगाव,मळेगाव थडी,सांगवी भुसार,काकडी,नाटेगाव, कासली,ओगदी,अंचलगाव,कोळगाव थडी,मायगाव देवी,हिंगणी,रवंदे,देर्डे चांदवड,धोंडेवाडी,सोनारी,आपेगाव,येसगाव,आदी ग्रामपंचायतीत आज एकही नामनिर्देशन दाखल झालेले नाही.आता दिवसागणिक या निवडणुकीत रंग भरला जाणार असून कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता कमीच असून तसे प्रोत्साहन देताना सत्ताधारी व विरोधक कोणीही दिसत नाही.नामनिर्देशन भरण्याची अखेरची मुदत ३० डिसेंबर आहे.त्यामुळे अद्याप दोन दिवस शिल्लक असल्याने या दोन दिवशी जास्त अर्ज दाखल होणार आहे.