निवडणूक
आता धाकटे पवार उतरणार कोपरगावच्या रणांगणात !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा धाकटे अजित पवार यांची जाहीर सभा गुरुवार दि.१४ नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित केली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- २०२४ ची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे.राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे.त्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघात दोन्ही पवार गटाच्या बाजूंनी जोर लावला जात असून ग्रामीण व शहरी भागात सभा आणि फेऱ्याना ऊत आला आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघ त्यालाअपवाद नाही.कोपरगाव शहरात शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार संदीप वर्पे यांची प्रचार सभा काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कोणतेही पेड गर्दी न आणता मोठ्या गर्दीचा उंचांक करत संपन्न झाली असताना व अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे यांचे पुढे त्यांनी मोठे आव्हान निर्माण केले असताना आता उद्या दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैदानात संपन्न होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या प्रसिध्दी विभागाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यामुळे ही सभा गर्दीचा किती उचांक करणार याकडे मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मतदार संघाच्या विकासासाठी साथ व सहकार्य मिळाले असल्याचा आशुतोष काळे यांचा दावा असून ते आपल्या शिलेदाराच्या प्रचारासाठी ते स्वत: गुरुवार दि.१४ रोजी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.त्यांचे विचार ऐकण्यासाठी महायुतीतील कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी शेवटी केले आहे.