जाहिरात-9423439946
मनोरंजन

मराठी कलाकारांचा गणेशोत्सव

जाहिरात-9423439946
bhushan pradhan



मुंबईत घर घेतल्यापासून मी गणपती बसवायला सुरुवात केली. यंदाचं हे चौथं वर्षं आहे. मागच्या तीन वर्षांप्रमाणेच यंदा सुद्धा आई शाडूच्या मातीची मूर्ती बनवणार आहे आणि त्याचीच स्थापना घरी करणार आहोत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा गणेशोत्सव खूप उत्साहात, प्रसन्न वातावरणात साजरा करणार आहे. आई शाडूच्या मातीची मूर्ती चिंचवडच्या घरी बनवते आणि त्याची स्थापना कांदिवलीच्या घरात होते. त्यामुळे चिंचवड आणि मुंबईतील दोन्ही घरांशी बाप्पा जोडला गेला आहे. माझ्या घरी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा केला जातो. सजावटसुद्धा पर्यावरणपूरक, पुनर्वापर करता येईल, अशीच असते, गणपती बाप्पाला आपण मूर्तीच्या रूपात आणतो, परंतु खऱ्या अर्थांने बाप्पा या दिवसांत आपल्या घरी येतो, तो पाहुण्यांच्या रूपात. जसं बाप्पाच्या चेहऱ्यावर जे हास्य आपल्याला दिसतं, तसंच हास्य मला घरी आलेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर बघायचं असतं.

या दीड दिवसांत दर्शनासाठी आमच्या घरी भरपूर लोकं येतात. खरं सांगायचं तर मी तितका धार्मिक नाही. तरीही गणपती बाप्पाशी माझं एक वेगळंच नातं आहे. वर्षभरात मी अध्यात्मिक नसतो, त्या वर्षभराची कसर या दीड दिवसांत भरून निघते. खूपच वेगळं वातावरण असतं घरी.
आमच्याकडे विसर्जन सुद्धा पर्यावरणपूरक पद्धतीनेच केले जाते. माझ्या घरात असलेल्या मोकळ्या भागात आम्ही बादलीत विसर्जन करतो. त्यासाठी फुलांची सजावट केलेली असते. बादलीतही गुलाब पाणी, अक्षता आणि फुलं असतात. विसर्जन झाल्यावर, बाप्पाची मूर्ती पाण्यात विरघळल्यानंतर त्याच शाडूच्या मातीनं आम्ही दरवर्षी एक हत्तीची प्रतिमा बनवतो. आणि ते हत्तीचं गोंडस रूप आमच्या घरी ठेवतो. यावरून एकही कळतं, की बाप्पाच्या मूर्तीची कुठेही विटंबना झालेली नाही. आपल्यामुळे पर्यावरणाला कुठेही त्रास झालेला नाही, हे पाहूनही खूप छान वाटतं. मी रोज देवळात वगैरे जात नसलो तरी दिवसातून एकदा तरी बाप्पाशी संभाषण साधतो. मनातल्या मनात का होईना बोलत असतो. हे कायमच नातं आहे आणि बाप्पा कायम आपल्या सोबत आहे, याची जाणीव असते. तो मार्ग दाखवत असतो, असे नेहमीच वाटते. बाप्पाकडे मी कधीच काहीही मागत नाही. कारण तो जे देतो, ते माझ्या चांगल्यासाठी आहे, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आपण मात्र शंभर टक्के प्रयत्न करायचा, हे लक्षात ठेवून मी आयुष्यात पुढे चालत आहे. बाप्पानेच दाखवलेला हा मार्ग आहे आणि त्याच्यामुळेच मी नवीन जोमाने करू शकतो. हा गणेशोत्सव साजरा करून लगेचच मी माझा आगामी चित्रपट ‘लग्नकल्लोळ’च्या डबिंगच्या कामात व्यस्त होणार आहे.मयुरी देशमुख

mayuri deshmukh

गणपती हे माझे आवडते दैवत असल्याने गणेश चतुर्थी माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या स्वतःच्या घरी मी अजून गणपती आणण्याची प्रथा सुरु केली नसल्याने मी अजूनही आईकडेच गणेशोत्सव साजरा करते. आमच्याकडची मूर्ती इको फ्रेंडली असते. सध्या ‘टी ट्री गणेशा’ मिळतो, ज्यात गणेशाची मातीची मूर्ती कुंडीत असते. विसर्जनाच्या वेळी फक्त पाणी टाकून ती माती सारख्या पातळीवर आणायची. त्यात एक बी असते. त्याचे नंतर झाड येते. मला ही संकल्पना खूप आवडली. त्यामुळे आमच्याकडे गणेशाची अशा पद्धतीची मूर्ती आणली जाते. सजावटही अगदी साधी असते. ज्यात थर्माकॉल, प्लॅस्टिकचा वापर अजिबात नसतो. नैवैद्यासाठी बाहेरून गोड पदार्थ आणण्यापेक्षा घरी गोडधोड पदार्थ बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि यात घरातील प्रत्येकाचा सहभाग असतो. या काळात एकंदरच घर आणि मन दोन्ही सकारात्मकतेने भरलेले असते. लहानपणापासूनच मला बाप्पाबद्दल विशेष ओढ आहे. कधीकधी अडचणीच्या काळात आपण डोळे बंद करून देवाची आठवण काढतो, तेव्हा सगळ्यात आधी माझ्यासमोर गणपतीचा चेहरा येतो. सिद्धिविनायक माझ्या घराजवळ आहे. मी अनेकदा सिद्धिविनायकला जाते. कॉलेजमध्ये असतानाही मला आठवतंय, मी आणि माझी मैत्रीण आम्ही चालत सिद्धिविनायकला जायचो. तेव्हा मी चर्चगेटला राहायचे. तेव्हा चर्चगेट ते सिद्धिविनायक मी चालत जायचे. आम्ही अडचणींचे निराकरण करण्यासाठी सिद्धाविनायकला जायचो आणि आमच्या इच्छा पूर्णही व्हायच्या. त्यामुळे बाप्पाशी अनेक कारणांनी मी जोडले गेले आहे. मी अनेकदा अथर्वशीर्षं म्हणत असते. दोन वर्षांपूर्वी सिद्धिविनायकला आदेश बांदेकर यांनी अथर्वशीर्षं कथन जपाचे आयोजन केले होते. जिथे अनुराधा पौडवाल त्यांच्या सुमधुर आवाजात अथर्वशीर्षं म्हणणार होत्या आणि आम्ही ‘झी मराठी’च्या काही अभिनेत्री त्यांच्या सोबत अथर्वशीर्षं म्हणणार होतो. त्यावेळचे वातावरण एकंदरच चैतन्यदायी होते. सकारात्मक लहरी सर्वत्र निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी मला असं वाटलं, की मी आठवीपासून सातत्यानं अथर्वशीर्षंचा जप करत आले आहे, त्याचं मला कुठेतरी हे फळ मिळालं असावं. माझ्यासाठी हा अद्भुत अनुभव होता. गणपती बाप्पा सदैव पाठीशी असतो. यंदाही मी बाप्पाकडे एक मागणं करणार आहे. माझ्या प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटाला उत्तम प्रस्तिसाद मिळूदे आणि बाप्पा माझं हे मागणं सुद्धा ऐकेल.
राहुल पेठे

rahul

बाप्पासोबतचं माझं नातं शब्दांत व्यक्त करताच येणार नाही. माझ्या चांगल्या- वाईट अशा सगळ्याच प्रसंगामध्ये बाप्पा माझ्या पाठीशी असतो, याचा मला ठाम विश्वास आहे. बाप्पाकड़ून मिळणारी ऊर्जा आणि सकारात्मकता माझ्यासाठी नेहमीच खास असते. आमच्या घरी साधारण ६०-७० वर्षांपासून किंवा त्याच्याही आधीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. आमच्याकडे दीड दिवसांचा गणपती असतो आणि वर्षानुवर्षं शिवरेकर पद्धतीचीच मूर्ती आणली जाते. मुळात आमचे सगळे कुटुंबीय एकाच बिल्डिंगमध्ये राहात असल्याने,गणेशोत्सव एकदम जल्लोषात साजरा केला जातो. आधी आम्ही एकाच्या घरी जमतो, त्यांच्याकडे आरती करतो मग दुसरीकडे मग तिथून पुढच्या घरी आरती. असं आमचं सुरूच असतं. वेगळीच मजा असते. एकमेकांकडे नैवेद्यासाठी जातो. या दीड दिवसांत आमच्या सगळ्यांच्याच घराचे दरवाजे उघडे असतात. या काळात एखाद्याला शोधणं, म्हणजे कठीण काम असतं. कधी कधी असं वाटतं, दीड दिवस खूपच कमी आहेत. इतके पटकन हे दिवस संपतात. आधी गणपती येणार म्हणून खूप उत्साह असतो आणि विसर्जनाच्या दिवशी मात्र खूप वाईट वाटते. लहानपणापासूनच मला गणेशोत्सवाचे खूप आकर्षण होते. शाळेत असताना तर विसर्जनाच्या दिवशी मला खूप रडू यायचे. तासनतास मी गणपतीसमोर बसून त्याला न्याहाळत बसायचो. आजही मी अनेकदा गणपतीच्या लोभस मूर्तीकडे बघत बसतो. बाप्पाच्या डोळ्यांतील प्रेमळ भावाचे मला नेहमीच आकर्षण राहिले आहे. आमच्याकडे पूर्वापार शाडूचीच मूर्ती आणली जाते आणि मागील १५-१६ वर्षांपासून आम्ही विसर्जनही गच्चीत मोठ्या टबमध्ये करतो, ज्याने पर्यावरणाचेही संतुलन राखले जाते. नेहमीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सवही माझ्यासाठी खासच असेल. माझ्या ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचे शूटिंग आता जवळपास संपत आले आहे. त्यामुळे यंदा ‘गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी मी बऱ्यापैकी निवांत आहे. त्यामुळे हा गणेशोत्सवही मी अगदी उत्साहात साजरा करेन.
माझं आणि गणपतीचं नातं स्पेशल – सुयोग गोऱ्हे

suyog

गणपती बाप्पा आणि माझं नातं स्पेशल आहे. मी मूळचा नाशिकचा असल्यामुळे नाशिकमध्ये नवश्या गणपती म्हणून गणपतीचं मंदिर आहे. नाशिकमध्ये असताना मी नेहमी तिथे जायचो. आता जेव्हा कधी मी नाशिकला जातो, तेव्हा मी आधी त्या मंदिरात जातो, त्यामुळे आमचं नातं स्पेशल आहे, असं मी म्हणेन. बाप्पाच्या सगळ्याच मूर्ती मनाला भावतात. आमच्याकडे दोन गणपती बसवले जातात. एक माझ्या घरात आणि दुसरा माझ्या हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमधील गणपती दहा दिवसांचा असतो परंतु माझ्या घरातील गणपती हा वर्षभर असतो. त्याची वर्षभर पूजा होते. म्हणजेच मागच्या वर्षी आणलेला बाप्पा आम्ही या वर्षी विसर्जित करतो आणि या वर्षी आणलेला गणपती आम्ही पुढच्या वर्षी विसर्जित करणार. गणपतीत आवडीची गोष्ट म्हणजे मोदक आणि करंजी खूप खायला मिळते. हॉस्पिटलमधील गणपतीची तिथले कर्मचारी आणि रुग्ण मनोभावे पूजा, आरती करतात. मी इको फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करण्याला प्राधान्य देतो. आमच्या घरीसुद्धा गेल्या दोन तीन वर्षांपासून ट्री गणेशाचे आगमन होतेय. खरं तर या वर्षीचा बाप्पा माझ्यासाठी खास आहे. कारण यावर्षी मी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ या ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अमित चारी

amit chari

यंदाचा गणेशोत्सव दणक्यात

आमच्याकडे दीड दिवसांचा गणपती असतो आणि गणपती येण्याच्या एक महिना आधीपासूनच मी उपवास करतो. खरंतर कामाच्या व्यापामुळे अनेकदा वेळ मिळत नाही. मात्र गणपती आगमनाच्या चार दिवस आधीपासून मी वेळात वेळ काढून गणपतीच्या तयारीला लागतो. आमच्याकडे वर्षानुवर्षं शाडूची मूर्ती आणली जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आमचा विशेष कल असतो. या दीड दिवसात आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती आपली काम बाजूला ठेवून, बाप्पाच्या सेवेत तत्पर असतो. अनेक जण दर्शनासाठी येतात त्यामुळे एकंदरच प्रसन्न वातावरण असते. घरात एक सकारात्मक ऊर्जा आलेली असते. प्रसादाची, गोडधोड पदार्थांची अगदी रेलचेल असते. ज्या बाप्पाची आपण इतक्या आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो, त्याचे विसर्जन होताना मात्र मन खिन्न होते. यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी विशेष आहे. व्यवसायात यश मिळाल्यानंतर आता माझा ‘बाप्पा मोरया’ हा पहिला मराठी अल्बमही नुकताच प्रदर्शित झाला आहे. बाप्पाच्याच आशीर्वादाने त्याला भरभरून प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जरा दणक्यातच साजरा होणार आहे.
सायली संजीव

sayali sanjeev

माझ्या आयुष्यात बाप्पाचं स्थान हे सगळ्यात उच्च आहे. बाप्पा आणि माझ्या नात्याबाबत सांगायचे, तर त्या मागे एक कारण आहे. मी आठवीत असताना माझे आजोबा वारले
होते. तोपर्यंत मी तशी नास्तिक होते. माझा या गोष्टींवर फारसा विश्वासच नव्हता. मात्र आजोबा गेल्यानंतर मला काही गोष्टी आपसूकच जाणवू लागल्या आणि अचानक माझ्यात गणपती बाप्पाबद्दल ओढ निर्माण झाली. इतकी, की मी अक्षरशः गप्पा मारायचे बाप्पासोबत. त्यामुळे आई-बाबासुद्धा चकित झाले होते. आतापर्यंत देवाला न मानणारी मी, अचानक देवाविषयी इतकी भक्ती कशी निर्माण झाली माझ्यात? हे कसं झालं हे मला सुद्धा माहित नाही. परंतु बाप्पा आणि माझ्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे. सगळ्यांनाच गणपती खूप जवळचा वाटतो. माझ्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे सकारात्मक ऊर्जा देणारा एक स्रोत आहे. माझ्या घरी सात दिवसांचा गणपती असतो. पूर्वी आमच्याकडे खूप सोवळं पाळायचे, जे आजही पाळले जाते. फक्त पुरुषांनीच गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करावी, अशा पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला मात्र मी खंड दिला. त्यासाठी मी घरी भांडले, आई – बाबांकडे हट्ट केला आणि अखेर मी जिंकले. बाप्पाची माझ्याकडून प्राणप्रतिष्ठा होणारे हे पाचवे वर्षं आहे. आमच्याकडे गौरीही असते. त्यामुळे गौरी -गणपती खूप जोरदार साजरे होतात. अर्थातच सगळं हे इको फ्रेंडली असते. मी गेल्या तीन वर्षांपासून फक्त विटांचा वापर करून जी सजावट करता येईल, ती करते. बाप्पाची माझ्यावर भरपूर कृपा आहे. चांगल्या -वाईट प्रत्येक प्रसंगात तो माझ्या पाठीशी असतो. माझ्या प्रत्येक निर्णयात तो मला सद्बुद्धी देतो, जेणे करून चुकीच्या निर्णयापासून मी लगेच ‘यु टर्न’घेऊ शकेन. त्याच्यामुळेच माझ्या पहिल्या ‘यु टर्न’ या वेबसिरीजबाबतीतही अनेक चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. त्याच्याच कृपेने मला आजपर्यंत अनेक चांगली कामं मिळाली, चांगली माणसं मिळाली. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात, अनेक वेगवेगळ्या माध्यमात मला काम करण्याची संधी मिळाली. त्याचा आशिर्वाद पुढेही माझ्यावर असाच राहू दे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close